यावल-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । तालुक्यालगतच्या सातपुडा पर्वतरांगांमध्ये मोठ्या प्रमाणावर सुरू असलेल्या अवैध वृक्षतोडीमुळे पर्यावरणीय संतुलन धोक्यात आल्याची गंभीर बाब समोर आली आहे. यावल पूर्व व पश्चिम वनपरिक्षेत्राच्या हद्दीत मौल्यवान वृक्षांची सर्रास कत्तल होत असल्याचा आरोप स्थानिकांकडून करण्यात येत असून या प्रकाराची तात्काळ चौकशी करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या अनेक दिवसांपासून सातपुडा पर्वतरांगांतील जंगल परिसरात दिवसाढवळ्या तसेच रात्रीच्या वेळीही झाडांची मोठ्या प्रमाणावर तोड सुरू आहे. जंगलतोड माफियाकडून नियोजनबद्ध पद्धतीने झाडांची कत्तल करून लाकडांची वाहतूक केली जात असल्याचे स्थानिक नागरिक सांगत आहेत. विशेष म्हणजे या प्रकाराकडे संबंधित यंत्रणांचे दुर्लक्ष होत असल्याचीही भावना व्यक्त केली जात आहे.

या बेकायदेशीर वृक्षतोडीमुळे परिसरातील वनसंपत्तीचे मोठे नुकसान होत असून पर्यावरणीय समतोल बिघडण्याचा धोका निर्माण झाला आहे. वन्यजीवांच्या अधिवासावरही याचा विपरीत परिणाम होत असल्याने पर्यावरणप्रेमी आणि सामाजिक कार्यकर्त्यांकडून तीव्र चिंता व्यक्त केली जात आहे. सातपुड्यासारख्या ऐतिहासिक व जैवविविधतेने समृद्ध पर्वतरांगेला यामुळे धोका निर्माण झाल्याचेही सांगितले जात आहे.
दरम्यान, यापूर्वीही विविध सामाजिक संघटनांनी जंगलतोड माफियाविरोधात वन विभागाकडे वारंवार तक्रारी केल्या आहेत. मात्र अद्याप ठोस कारवाई होत नसल्याचा आरोप केला जात आहे. त्यामुळे वन विभागाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असून नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण आहे.
या पार्श्वभूमीवर, या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून अवैध वृक्षतोड करणाऱ्यांवर तसेच त्यांना सहकार्य करणाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी ठाम मागणी पुढे आली आहे. शिवसेना शिंदे गटाचे रावेर लोकसभा पूर्व क्षेत्राचे जिल्हा सहसंघटक नितिन सोनार यांनी यावल पूर्व वनपरिक्षेत्र अधिकारी तसेच जळगाव येथील उपवनसंरक्षक सौरिष सहाय यांच्याकडे लेखी निवेदन देऊन चौकशीची मागणी करण्याचा इशारा दिला आहे.
तसेच भविष्यात अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी संबंधित भागात वन विभागाने गस्त वाढवावी, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा आणि दोषींवर कठोर कारवाई करावी, अशीही मागणी करण्यात आली आहे. या कारवाईकडे आता संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.



