यावल-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । तालुक्यातील किनगाव येथील डोणगाव रोडवरील इंग्लिश मीडियम निवासी पब्लिक स्कूलमध्ये राजस्थान फूड फेस्टिवल, डॉ. अब्दुल कलाम विज्ञान प्रदर्शन आणि के.के. मुसा आर्ट गॅलरीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी शिक्षणासोबतच अनुभवाधारित उपक्रमांचा अनोखा संगम साकारला. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष कृतीतून शिकण्याची संधी मिळाली आणि परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.
या फूड फेस्टिवलचे वैशिष्ट्य म्हणजे राजस्थानातील प्रसिद्ध खाद्यपदार्थांचे स्टॉल विद्यार्थ्यांनी स्वतः उभारले होते. विशेष म्हणजे हे पदार्थ रेडीमेड न आणता विद्यार्थ्यांनी स्वतःच्या हाताने तयार करून ग्राहकांना दिले. कांदा कचोरी, दाल बाटी चुरमा, मिरची वडा, गट्टे की सब्जी, कढी पकोडा, जोधपुरी पुलाव, केशर लस्सी, थंडाई, रबडी, मालपुवा, मावा कचोरी, बालुशाही यांसारख्या विविध पदार्थांचा आस्वाद घेण्यासाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली होती. विद्यार्थ्यांच्या या प्रयत्नांचे सर्वत्र कौतुक करण्यात आले.

कार्यक्रमात खाद्यपदार्थांसोबतच विविध खेळांचे स्टॉलही उभारण्यात आले होते. फुगे फुगवणे, बकेट कॉइन, निशाणा लावा-वस्तू जिंका, रिंग टाकून बक्षीस मिळवा, बॉलने बाटल्या पाडणे अशा खेळांमुळे लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनी आनंद लुटला. त्यामुळे संपूर्ण परिसरात जत्रेसारखे वातावरण निर्माण झाले होते.
कार्यक्रमाची सुरुवात प्रवेशद्वाराजवळ उभारलेल्या अयोध्येच्या आकर्षक प्रतिकृतीपुढे प्रभू रामचंद्र यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. यानंतर विज्ञान दिनाच्या निमित्ताने आयोजित विज्ञान प्रदर्शनात विद्यार्थ्यांनी विविध वैज्ञानिक मॉडेल्स सादर केली. त्यांच्या कल्पकतेचे आणि वैज्ञानिक दृष्टीकोनाचे प्रदर्शन या माध्यमातून पाहायला मिळाले.
त्याचबरोबर के.के. मुसा आर्ट गॅलरी अंतर्गत पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांनी काढलेल्या चित्रांचेही प्रदर्शन भरविण्यात आले होते. या छोट्या कलाकारांनी रंगांच्या माध्यमातून आपली सर्जनशीलता प्रभावीपणे मांडली. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन मिळाले.
या संपूर्ण उपक्रमामागील उद्देश विद्यार्थ्यांना शिक्षणाबरोबरच आर्थिक व्यवहाराचे ज्ञान मिळावे हा होता. विद्यार्थ्यांना पैशांचे व्यवहार समजावेत यासाठी शाळेच्या वतीने कुपन पद्धतीचा अवलंब करण्यात आला होता. १०, २०, ५० आणि १०० रुपयांच्या कुपनद्वारे खरेदी-विक्रीची प्रक्रिया पार पडली. यामुळे विद्यार्थ्यांना व्यवहारज्ञानाची प्रत्यक्ष अनुभूती मिळाली.
या कार्यक्रमाचे आयोजन सांस्कृतिक समितीच्या माध्यमातून करण्यात आले. विविध स्टॉलचे नियोजन, संचालन आणि परीक्षण शिक्षक व व्यवस्थापनाने काटेकोरपणे केले. शाळेचे सचिव मनिष पाटील, संस्थेच्या संचालिका सौ. पुनम पाटील, मुख्याध्यापक अशोक पाटील व उपमुख्याध्यापक सुहास भालेराव यांनी प्रत्येक स्टॉलला भेट देत विद्यार्थ्यांचे कौतुक केले.
या आनंदमयी उपक्रमात शाळेचे संस्थापक चेअरमन विजयकुमार पाटील, उपाध्यक्षा सौ. शैलेजा पाटील यांच्यासह पालक, विद्यार्थी व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. राजस्थानी खाद्यसंस्कृतीचा आस्वाद घेत सर्वांनी या उपक्रमाचा मनसोक्त आनंद लुटला.



