Home राजकीय राज्यसभा क्रॉस व्होटिंग : ओडिशात काँग्रेसकडून तीन आमदारांची पक्षातून हकालपट्टी

राज्यसभा क्रॉस व्होटिंग : ओडिशात काँग्रेसकडून तीन आमदारांची पक्षातून हकालपट्टी


नवी दिल्ली-वृत्तसेवा | राज्यसभा निवडणुकीनंतर काँग्रेस पक्षात क्रॉस व्होटिंगचा मुद्दा चांगलाच तापला आहे. ओडिशामध्ये राज्यसभा निवडणुकीत क्रॉस व्होटिंग केल्याच्या आरोपावरून काँग्रेसने आपल्या तीन आमदारांना पक्षातून काढून टाकले असून त्यांना विधानसभा सदस्यत्वासाठी अपात्र ठरवण्याची प्रक्रिया देखील सुरू केली आहे. दुसरीकडे हरियाणामध्येही पाच आमदारांनी क्रॉस व्होटिंग केल्याचा संशय असून त्यांना नोटीस देण्याच्या तयारीत काँग्रेस पक्ष आहे.

ओडिशामध्ये काँग्रेसने रमेश जेना, दशरथी गोमांगो आणि सोफिया फिरदौस या तीन आमदारांवर कठोर कारवाई करत त्यांना पक्षातून बडतर्फ केले आहे. या तिन्ही आमदारांनी राज्यसभा निवडणुकीत भाजप समर्थित अपक्ष उमेदवार दिलीप राय यांच्या बाजूने मतदान केले होते. या क्रॉस व्होटिंगमुळे काँग्रेस आणि बीजेडीच्या संयुक्त उमेदवाराचा पराभव झाला. त्यामुळे पक्षाने या आमदारांवर शिस्तभंगाची कारवाई करत त्यांना निलंबित केले असून त्यांच्या विधानसभा सदस्यत्वावरही गदा येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

प्रदेश काँग्रेस अध्यक्ष भक्त चरण दास यांनी सांगितले की, या तिन्ही आमदारांकडून अशा प्रकारच्या कृतीची अपेक्षा नव्हती. त्यांच्या वर्तनामुळे पक्षाच्या हिताला धक्का बसला आहे. त्यामुळे संविधानाच्या दहाव्या अनुसूचीनुसार त्यांना अपात्र ठरवण्याची मागणी विधानसभा अध्यक्षांकडे करण्यात आली आहे. प्रदेश काँग्रेसच्या माध्यम कक्षाचे अध्यक्ष अरविंद दास यांनीही या कारवाईला दुजोरा देत सांगितले की, आमदारांच्या कृतीचे पुनरावलोकन केल्यानंतरच ही कठोर कारवाई करण्यात आली आहे.

दरम्यान हरियाणामध्येही राज्यसभा निवडणुकीदरम्यान क्रॉस व्होटिंगचा मुद्दा समोर आला आहे. काँग्रेस पक्ष पाच आमदारांना नोटीस देण्याच्या तयारीत आहे. याच पार्श्वभूमीवर हरियाणा काँग्रेसचे कार्यकारी प्रदेशाध्यक्ष रामकिशन गुर्जर यांनी पक्षाला रामराम ठोकला आहे. मीडिया रिपोर्टनुसार, त्यांची पत्नी आणि नारायणगडच्या आमदार शैली चौधरी देखील पक्ष सोडण्याच्या तयारीत असल्याची चर्चा सुरू आहे. मात्र त्या अद्याप पक्षाच्या हायकमांडच्या भूमिकेची प्रतीक्षा करत असल्याचे सांगितले जात आहे.

हरियाणामध्ये राज्यसभेच्या दोन जागांसाठी झालेल्या निवडणुकीचा निकाल मतदानानंतर जवळपास नऊ तासांनी सोमवारी रात्री एक वाजता जाहीर झाला. भाजपचे संजय भाटिया आणि काँग्रेसचे कर्मवीर बौद्ध यांनी विजय मिळवला, तर भाजप समर्थित अपक्ष उमेदवार सतीश नांदल यांना पराभवाला सामोरे जावे लागले. या निवडणुकीत एकूण ९० आमदारांची मते होती, मात्र इंडियन नॅशनल लोकदलच्या दोन आमदारांनी मतदान केले नाही. काँग्रेसची चार आणि भाजपचे एक मत रद्द झाल्याने एकूण ८३ मते वैध ठरली.

राज्यसभा निवडणुकीत १६ मार्च रोजी ११ जागांसाठी मतदान झाले होते. त्यापैकी नऊ जागा एनडीएच्या खात्यात गेल्या. यापूर्वी १० राज्यांतील ३७ जागांपैकी २६ जागांवर उमेदवार बिनविरोध निवडून आले होते. या निवडणुकांमध्ये विविध राज्यांमध्ये झालेल्या क्रॉस व्होटिंगमुळे अनेक राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.


Protected Content

Play sound