सावदा-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । सावदा शहरात आदिशक्ती मुक्ताबाई सिद्ध पादुका दर्शन सोहळ्याचे आयोजन सोमवार, दि. १६ मार्च २०२६ रोजी करण्यात आले असून या निमित्ताने शहरात भक्तिमय वातावरण निर्माण होणार आहे. यावर्षीचा मुक्ताई फिरता नारळी सप्ताहाचा यजमानपद यावल व रावेर तालुक्याला मिळाल्याने परिसरातील भाविकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
या महोत्सवाचे नियोजन महामंडलेश्वर जनार्दन हरीजी महाराज व रवींद्र हरणे महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले आहे. आदिशक्ती मुक्ताबाई यांच्या सिद्ध पादुकांचे आगमन सावदा शहरात सकाळी सुमारे ८.३० वाजता होणार असून त्यानिमित्त भव्य दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.

दिंडी सोहळ्याची सुरुवात गांधी चौक येथील विठ्ठल मंदिरापासून होणार असून त्यानंतर दिंडी शहरातील विविध प्रमुख मार्गांवरून मार्गक्रमण करणार आहे. या दिंडीमध्ये विठ्ठल मंदिर, संभाजी चौक, इंदिरा चौक, लहान मारोती मंदिर, मोठा आड, स्वामीनारायण मंदिर तसेच सोमवारगिरी मढी या ठिकाणांचा समावेश आहे. दिंडी सोहळ्यात मोठ्या संख्येने भाविक सहभागी होणार असून भजन, कीर्तन आणि नामस्मरणाने वातावरण भक्तिमय होणार आहे.
या सोहळ्याच्या निमित्ताने शहरातील विविध धार्मिक संस्था, मंडळे आणि भाविकांनी मोठ्या उत्साहाने तयारी सुरू केली आहे. शहरातील मार्गांची स्वच्छता, रांगोळी, पुष्पवृष्टी तसेच स्वागताची विविध तयारी करण्यात येत असून भाविकांना पादुकांचे दर्शन घेण्याची सुवर्णसंधी मिळणार आहे.
सावदा शहरातील हा सोहळा धार्मिक व सांस्कृतिक परंपरेचा महत्त्वाचा भाग मानला जात असून मोठ्या संख्येने भाविक उपस्थित राहण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. शहरातील नागरिक आणि भाविकांनी या पवित्र सोहळ्यात सहभागी होऊन आदिशक्ती मुक्ताबाईंच्या सिद्ध पादुकांचे दर्शन घ्यावे, असे आवाहन सकल हिंदू समाज भाविक मंडळ, सावदा यांच्या वतीने करण्यात आले आहे.
या सोहळ्यामुळे सावदा शहरात भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचे वातावरण निर्माण होणार असून धार्मिक परंपरेचा हा सोहळा भाविकांसाठी अविस्मरणीय ठरणार आहे.



