रावेर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जिल्ह्यातील केळी पीक विमा योजनेत मोठ्या प्रमाणात बोगस अर्ज भरल्याचा संशय व्यक्त होत असल्याने रावेर तालुक्यातील पाच सीएससी (कॉमन सर्व्हिस सेंटर) केंद्रांची चौकशी सुरू करण्यात आली आहे. जिल्ह्यात एकूण ११ हजार ९०१ हेक्टर क्षेत्रावर केळी पीक नसतानाही सुमारे ४ हजार ५३५ हेक्टर क्षेत्रावर अधिकचा विमा काढल्याचा प्राथमिक निष्कर्ष तपासणीत समोर आला आहे.

पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजना (आंबिया बहार २०२५-२६) अंतर्गत केळी पिकाच्या विमा क्षेत्राची तपासणी करण्यात येत असून, यासंदर्भात ६ मार्च रोजी जिल्हास्तरीय आढावा समितीची बैठक घेण्यात आली होती. या बैठकीत बोगस विमाधारकांवर कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या. मागील वर्षाच्या तुलनेत चालू वर्षी जिल्ह्यात विमा अर्जांची संख्या सुमारे २५ टक्क्यांनी वाढल्याने संशय निर्माण झाला होता.
शासन निर्णयानुसार आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने क्षेत्र तपासणी करण्याचे निर्देश आयुक्त (कृषी), पुणे यांनी दिले होते. त्यानुसार विमा कंपनीने महाराष्ट्र सुदूर संवेदन उपयोजन केंद्र, नागपूर (MRSAC) यांच्या माध्यमातून जळगाव, मुक्ताईनगर, यावल, रावेर, चोपडा, धरणगाव आणि जामनेर या सात तालुक्यांमधील केळी पिकाच्या क्षेत्राची उपग्रहाधारित तपासणी केली.
या तपासणीत ४८ सीएससी केंद्रांमार्फत मोठ्या प्रमाणावर बोगस विमा अर्ज भरल्याचे आढळून आले. त्यानुसार संबंधित केंद्रांची आयडीवार माहिती विमा कंपनीने प्रशासनाला पाठवली असून आता तालुका स्तरावर चौकशी सुरू करण्यात आली आहे. संबंधित समित्यांना ११ मार्चपर्यंत चौकशी करून अहवाल वरिष्ठांकडे सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
रावेर येथील चौकशी समितीत जिल्हा उपविभागीय कृषी अधिकारी हर्षदा देसले अध्यक्ष म्हणून काम पाहत असून तालुका कृषी अधिकारी भाऊसाहेब वाळके, भारतीय कृषी विमा कंपनीचे जिल्हा प्रतिनिधी हेमंत शिंदे, जिल्हा व्यवस्थापक सीएससी सेंटर, जळगाव तसेच मंडळ कृषी अधिकारी अनिल महाजन आदी सदस्यांचा समावेश आहे. ही समिती संबंधित गावांना भेट देऊन सीएससी केंद्रांची पडताळणी करत आहे.
जिल्ह्यातील विविध तालुक्यांमधील सीएससी केंद्रांची संख्या पुढीलप्रमाणे आहे : मुक्ताईनगर – ५, यावल – ८, रावेर – ५, चोपडा – ११, धरणगाव – ६, पाचोरा व जळगाव – १३ आणि भुसावळ – १. अशा एकूण ४९ केंद्रांची चौकशीच्या फेऱ्यात समावेश करण्यात आला आहे.



