
जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । गोरगरिबांची सेवा हीच खरी परमेश्वराची सेवा असून शासनाच्या योजना प्रत्येक पात्र नागरिकापर्यंत पोहोचल्या पाहिजेत, असे प्रतिपादन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले. जळगाव तालुक्यातील भोकर व आसोदा येथे आयोजित ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर’च्या शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते. या शिबिराच्या माध्यमातून शेकडो नागरिकांना विविध शासकीय योजनांचा थेट लाभ देण्यात आला.

पालकमंत्री गुलाबराव पाटील म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्यकारभार करताना “रयतेचा राजा म्हणजे रयतेची सेवा” हा विचार मांडला होता. त्याच विचारातून शासन आता जनतेच्या दारी पोहोचत आहे. एखाद्या गरीब आईला मुलासाठी दाखला मिळणे, शेतकऱ्याचा जमीन प्रश्न सुटणे किंवा एखाद्या कुटुंबाला घरकुल मिळणे या छोट्या-छोट्या आनंदातूनच शासनाच्या कार्याचे खरे समाधान मिळते, असे त्यांनी नमूद केले.
ते पुढे म्हणाले की, पूर्वी एखाद्या साध्या दाखल्यासाठी नागरिकांना तहसील, पंचायत समिती किंवा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या अनेक फेऱ्या माराव्या लागत होत्या. त्यामुळे वेळ आणि पैसा खर्च होऊन नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत होता. मात्र आता शासनाने ठरवले आहे की जनता शासनाच्या दारी उभी राहणार नाही, तर शासनच जनतेच्या दारी जाईल. या संकल्पनेतूनच ‘महाराजस्व समाधान शिबिर’ सुरू करण्यात आले आहे. गेल्या वर्षभरात जिल्ह्यात हजारो लाभार्थ्यांना या शिबिरातून सातबारा उतारे, उत्पन्न दाखले, घरकुल तसेच विविध शासकीय योजनांचा लाभ मिळाला आहे.
यावेळी त्यांनी राज्य सरकारच्या शेतकरी हिताच्या निर्णयांचाही उल्लेख केला. सरकारने दिलेला शब्द पाळत दोन लाख रुपयांपर्यंत कर्जमाफीची अंमलबजावणी करण्यात आली असून नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांचे प्रोत्साहन देण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली. पालकमंत्री म्हणून प्रशासनाला स्पष्ट सूचना दिल्या असून शासनाच्या योजना केवळ कागदावर न राहता प्रत्येक पात्र नागरिकापर्यंत पोहोचल्या पाहिजेत, असे त्यांनी सांगितले. अधिकाऱ्यांनी लोकांशी संवेदनशीलतेने वागावे, कारण शासनाच्या टेबलापलीकडे एका कुटुंबाचे आयुष्य उभे असते, याची जाणीव ठेवण्याचेही त्यांनी आवाहन केले.
प्रांताधिकारी विनय गोसावी यांनी प्रस्ताविकात या अभियानाचे महत्त्व स्पष्ट केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नायब तहसीलदार प्राजक्ता केदार व उपशिक्षक सुनील पाटील यांनी केले, तर तहसीलदार शीतल राजपूत यांनी उपस्थितांचे आभार मानले.
आसोदा येथे आयोजित कार्यक्रमात स्थानिक शाळेतील विद्यार्थ्यांनी कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या जीवनावर आधारित काव्यनाटिका सादर करून उपस्थितांची मने जिंकली. विद्यार्थ्यांनी बहिणाबाईंच्या काव्यातील ग्रामीण जीवन, कष्टकरी संस्कृती आणि जीवनमूल्ये प्रभावी अभिनयातून उभी केली. या सादरीकरणाला पालकमंत्र्यांसह उपस्थित मान्यवर आणि नागरिकांनी उत्स्फूर्त दाद दिली.
या दोन्ही शिबिरांमध्ये कृषी, महसूल, पशुसंवर्धन, भूमी अभिलेख, महिला बचत गट आणि आरोग्य विभाग आदी विविध विभागांचे स्टॉल उभारण्यात आले होते. आदिवासी शालेय विद्यार्थ्यांना दप्तरांचे वाटप करण्यात आले. तसेच रहिवास प्रमाणपत्र, डिजिटल ७/१२, अनुसूचित जमाती जात प्रमाणपत्र, संजय गांधी व श्रावणबाळ योजना, विधवा पेन्शन योजना, दिव्यांग लाभार्थी योजना, जिवंत ७/१२ वारस नोंदी, उत्पन्न दाखले, रेशन कार्ड वाटप, फार्मर आयडी आणि आयुष्मान कार्ड आदी विविध योजनांचा लाभ नागरिकांना देण्यात आला. यात असोदा येथे ६१३ तर भोकर येथे ६७७ अशा एकूण १२९० लाभार्थ्यांना विविध सेवा व प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले.
या कार्यक्रमाला भोकर येथे सरपंच प्रमिलाबाई सोनवणे, मंडळ अधिकारी आशिष वाघ, असोदा मंडळ अधिकारी अजिंक्य आंधळे, बालाशेठ राठी, तालुकाप्रमुख शिवराज पाटील, गोपालजी बाहू, डॉ. सत्वशील पाटील, भरत बोरसे, उपतालुका प्रमुख प्रमोद सोनवणे, डॉ. कमलाकर पाटील, किशोर पाटील, पंकज पाटील, दत्तू आबा सोनवणे, किसन सोनवणे, छोटू सरकार, सुभाष बडगुजर, रमेश आप्पा पाटील आणि डॉ. दिलीप लाठी उपस्थित होते. तसेच असोदा येथे सामाजिक कार्यकर्ते तुषार महाजन, रवींद्र देशमुख, दूध संघाचे खेमचंद महाजन, सुभाष महाजन, अनिल महाजन, किशोर चौधरी, गिरीश भोळे, अजय महाजन, उमेश बाविस्कर, महेंद्र नारखेडे, संजोग कोळी, बाळकृष्ण पाटील तसेच श्रीराम मंदिराचे ट्रस्टी, भोकर व आसोदा परिसरातील सरपंच, उपसरपंच, लाभार्थी, अधिकारी-कर्मचारी आणि शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.



