
अहमदाबाद- वृत्तसेवा। आयसीसी टी-20 विश्वचषक 2026 च्या अंतिम सामन्याची उत्सुकता शिगेला पोहोचली असून भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील महामुकाबला 8 मार्च रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर रंगणार आहे. या मोठ्या लढतीपूर्वी सर्वांचे लक्ष खेळपट्टीकडे लागले आहे. अंतिम सामन्यासाठी वापरण्यात येणाऱ्या पिचबाबत महत्त्वाची माहिती समोर आली असून लाल आणि काळ्या मातीच्या मिश्रणातून तयार केलेल्या सेंटर पिचवर हा सामना खेळवला जाणार असल्याचे समजते.

टीम इंडिया आणि न्यूझीलंडचे खेळाडू अंतिम सामन्यासाठी आधीच अहमदाबादला पोहोचले आहेत. उपांत्य फेरीत न्यूझीलंडने दक्षिण आफ्रिकेचा पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केला, तर भारताने इंग्लंडविरुद्ध थरारक लढतीत 7 धावांनी विजय मिळवत सलग दुसऱ्यांदा फायनलमध्ये स्थान मिळवले. त्यामुळे आता दोन्ही संघांमधील अंतिम लढत अधिकच रोमांचक ठरण्याची शक्यता आहे.
नरेंद्र मोदी स्टेडियमवरील अंतिम सामन्यासाठी वापरण्यात येणारी खेळपट्टी फलंदाजांसाठी अनुकूल ठरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. क्रिकेट तज्ज्ञांच्या मते, या पिचवर चांगला बाऊन्स मिळण्याची शक्यता असून त्यामुळे मोठे शॉट्स खेळणे सोपे जाऊ शकते. मुंबईतील सामन्यांप्रमाणे येथेही धावांचा पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पिच लाल आणि काळ्या मातीच्या मिश्रणातून तयार केल्याने वेगवान गोलंदाजांना सुरुवातीच्या टप्प्यात काही प्रमाणात मदत मिळू शकते, मात्र फिरकीपटूंना फारसा फायदा होण्याची शक्यता कमी असल्याचे सांगितले जात आहे.
या स्पर्धेत आतापर्यंत या विशिष्ट पिचवर फक्त एकच सामना खेळवण्यात आला आहे. 9 फेब्रुवारी रोजी कॅनडा आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात झालेल्या त्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने प्रथम फलंदाजी करत 213 धावांचा मोठा डोंगर उभा केला होता. त्यानंतर त्यांनी कॅनडाला 53 धावांनी पराभूत केले होते. विशेष म्हणजे त्या सामन्यानंतर जवळपास एक महिना या पिचवर कोणताही सामना खेळवण्यात आलेला नाही. त्यामुळे फायनलसाठी ही खेळपट्टी पूर्णपणे ताजी आणि अनटच्ड असणार आहे.
दरम्यान, या विश्वचषकात अहमदाबादमध्ये भारत आणि न्यूझीलंड दोन्ही संघांना धक्का बसलेला आहे. भारतीय संघाने येथे दोन सामने खेळले असून त्यापैकी एका सामन्यात विजय मिळवला, तर दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात भारताला 76 धावांनी पराभव पत्करावा लागला होता. त्यामुळे फायनलमध्ये भारतासाठी ही खेळपट्टी एकप्रकारे आव्हानात्मक ठरणार आहे.
न्यूझीलंड संघालाही अहमदाबादमध्ये पराभवाचा अनुभव आला आहे. 14 फेब्रुवारी रोजी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध झालेल्या सामन्यात न्यूझीलंडने 176 धावांचे लक्ष्य दिले होते. मात्र दक्षिण आफ्रिकेने अवघ्या 17.1 षटकांत केवळ तीन विकेट्स गमावत हे लक्ष्य सहज गाठले होते. त्यामुळे या मैदानावर कीवी संघालाही आपली रणनीती अधिक अचूक आखावी लागणार आहे.



