Home उद्योग ‘लाईनमन हाच महावितरणचा खरा शिलेदार’ : अधीक्षक अभियंता सुरेंद्र कटके

‘लाईनमन हाच महावितरणचा खरा शिलेदार’ : अधीक्षक अभियंता सुरेंद्र कटके


बुलढाणा-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी ।  वीज ही आधुनिक जीवनाची अत्यावश्यक गरज बनली असून ती अखंडितपणे ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यासाठी महावितरणचे लाईनमन दिवस-रात्र परिश्रम घेत असतात. वादळ, पाऊस, उन्हाळा किंवा कोणतीही आपत्ती असो, लाईनमन आपली जबाबदारी पार पाडत नागरिकांना अखंड वीजपुरवठा देण्यासाठी कार्यरत असतात. त्यामुळेच जनसामान्यात ‘जनमित्र’ म्हणून ओळखला जाणारा लाईनमन हा महावितरणचा खरा शिलेदार असल्याचे प्रतिपादन अधीक्षक अभियंता सुरेंद्र कटके यांनी केले.

बुलढाणा येथील विद्युत भवनात ४ मार्च रोजी राष्ट्रीय लाईनमन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी लाईनमनच्या कार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमाला हास्य जत्रा फेम विनोदी कलाकार कुणाल मेश्राम यांची विशेष उपस्थिती लाभली. यावेळी कार्यकारी अभियंता मंगलसिंग चव्हाण यांच्यासह जिल्ह्यातील अनेक जनमित्र आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात सुरक्षेची शपथ घेऊन करण्यात आली. यानंतर अधीक्षक अभियंता सुरेंद्र कटके यांनी आपल्या भाषणात महावितरणच्या कामाचे महत्त्व अधोरेखित केले. त्यांनी सांगितले की, आगामी काळात शंभर टक्के वीजबिल वसुली आणि दर्जेदार सेवा देणे अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे. ग्राहकांच्या अपेक्षा पूर्ण करत ‘ईज ऑफ लिव्हिंग’नुसार सेवा देणे ही काळाची गरज असून त्यासाठी सर्व कर्मचाऱ्यांनी एकजुटीने आणि अधिक जोमाने काम करण्याची आवश्यकता आहे. महावितरणचे काम हे पूर्णपणे सांघिक स्वरूपाचे असल्याने प्रत्येक कर्मचाऱ्याची भूमिका महत्त्वाची असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

कार्यक्रमादरम्यान कर्मचाऱ्यांच्या मनोरंजनासाठी आणि तणावमुक्तीसाठी विशेष सत्र आयोजित करण्यात आले होते. हास्य जत्रा फेम कुणाल मेश्राम यांनी आपल्या विनोदी शैलीत सादरीकरण करून उपस्थितांना खळखळून हसवले. सतत ऑनड्युटीवर राहून काम करणाऱ्या लाईनमनच्या ताणतणावाला काही क्षण विसरायला लावण्याचा हा प्रयत्न यशस्वी ठरला. त्यांनी विनोदासोबतच आनंदी आणि संतुलित जीवनाचे महत्त्वही उपस्थितांना पटवून दिले.

कुणाल मेश्राम यांच्या सादरीकरणातून महावितरणच्या लाईनमनच्या कार्याचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले. या कार्यक्रमात अधीक्षक अभियंता सुरेंद्र कटके आणि प्रमुख उपस्थिती कुणाल मेश्राम यांच्या हस्ते जिल्ह्यातील जनमित्रांचा गौरव करण्यात आला. यामुळे उपस्थित कर्मचाऱ्यांना नवचैतन्य आणि कामासाठी नवी ऊर्जा मिळाल्याची भावना व्यक्त करण्यात आली.

महावितरणच्या लाईनमनच्या कार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमामुळे कर्मचाऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. सतत आव्हानात्मक परिस्थितीत काम करणाऱ्या लाईनमनच्या योगदानाचा सन्मान करत त्यांना प्रोत्साहन देण्याचा हा प्रयत्न सर्वांनी कौतुकास्पद असल्याचे मत व्यक्त केले.

 


Protected Content

Play sound