
नवी दिल्ली-वृत्तसेवा | भाजपने मंगळवारी राज्यसभेच्या निवडणुकीसाठी 9 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांना बिहारमधून उमेदवारी देण्यात आली आहे. त्यांच्यासोबत शिवेश कुमार यांचेही नाव यादीत समाविष्ट आहे.

छत्तीसगडमधून लक्ष्मी वर्मा, आसाममधून तेराश गोवाला आणि जोगेन मोहन, हरियाणातून संजय भाटिया, ओडिशातून मनमोहन सामल व सुजित कुमार, तर पश्चिम बंगालमधून राहुल सिन्हा यांना भाजपने उमेदवारी दिली आहे.
देशातील 10 राज्यांमधील 37 राज्यसभा जागांसाठी 16 मार्च रोजी मतदान होणार आहे. सकाळी 9 ते सायंकाळी 4 वाजेपर्यंत मतदान होईल आणि त्याच दिवशी सायंकाळी 5 वाजता मतमोजणी केली जाईल. संबंधित सदस्यांचा कार्यकाळ एप्रिल 2026 मध्ये संपत असल्याने या जागा रिक्त होत आहेत. राज्यसभेचा कार्यकाळ सहा वर्षांचा असतो. निवडून आलेल्या सदस्यांचा कार्यकाळ शपथविधीपासून 2032 पर्यंत राहणार आहे.
निवडणूक आयोगाने 18 फेब्रुवारी रोजी निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या होत्या. रिक्त होणाऱ्या 37 जागांपैकी 12 जागा एनडीएच्या ताब्यात आहेत, तर 25 जागांवर विरोधकांचे वर्चस्व आहे. महाराष्ट्रातील 7, तामिळनाडूतील 6 आणि पश्चिम बंगाल व बिहारमधील प्रत्येकी 5 जागांसाठी निवडणूक होणार आहे. ज्यांचा कार्यकाळ 2 एप्रिल रोजी संपत आहे, त्यामध्ये शरद पवार, रामदास आठवले, कनिमोझी, तिरुची शिवा आणि राज्यसभेचे उपसभापती हरिवंश यांचा समावेश आहे.
मतदानासाठी रिटर्निंग ऑफिसरने दिलेल्या जांभळ्या रंगाच्या स्केच पेनाचाच वापर करावा लागणार असून इतर कोणतेही पेन ग्राह्य धरले जाणार नाही. निवडणुका शांततापूर्ण व निष्पक्ष पार पडाव्यात यासाठी निरीक्षक नेमले जाणार आहेत.
राज्यसभा ही स्थायी सभा असून तिचे एक-तृतीयांश सदस्य दर दोन वर्षांनी निवृत्त होतात. एकूण 245 सदस्यांपैकी 233 सदस्यांची निवड आमदारांमार्फत अप्रत्यक्ष मतदानाने होते, तर 12 सदस्य राष्ट्रपतींकडून नामनिर्देशित केले जातात.
महाराष्ट्रातील 7 जागांच्या उदाहरणावरून निवडणुकीचा कोटा समजतो. विधानसभेतील 288 आमदार आणि 7 रिक्त जागा गृहित धरल्यास सूत्रानुसार (एकूण आमदार x 100)/(जागा +1) +1 असे गणित लावले जाते. त्यानुसार 288×100/8 = 3600, त्यात 1 मत वाढवून 3601 असा कोटा ठरतो. एका आमदाराच्या मताचे मूल्य 100 असल्याने एका उमेदवाराला किमान 36 आमदारांचे प्रथम प्राधान्य मत मिळणे आवश्यक ठरते.



