
रावेर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । रावेर शहरात वाढत्या तेलदरांच्या पार्श्वभूमीवर सुमारे ३३ हजार रुपये किमतीचे पाच क्विंटल ४० किलो सोयाबीन तेल अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे व्यापारी वर्गात खळबळ उडाली असून पोलिसांनी अज्ञात संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रावेर शहरातील सावदा रस्त्यावर भारत गॅससमोर असलेल्या ‘न्यू बंटी ट्रेडर्स’ या घाऊक किराणा दुकानासमोरील मोकळ्या शेडमधून तीन बॅरलमध्ये ठेवलेले सोयाबीन तेल चोरट्यांनी चोरून नेले. या तीन बॅरलमध्ये एकूण पाच क्विंटल ४० किलो तेल साठवलेले होते. सकाळी दुकान उघडताना तेलाचे बॅरल गायब असल्याचे लक्षात येताच परिसरात एकच खळबळ उडाली.
या प्रकरणी दुकान मालक सोहनलाल किशोर गगनानी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून रावेर पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या चोरीमागे नियोजनबद्ध कट असल्याची शक्यता वर्तवली जात असून परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी सुरू आहे. तपास पोलिस नाईक समाधान ठाकूर करीत आहेत.
दिवसेंदिवस वाढणारी महागाई आणि खाद्यतेलांच्या किमतींमध्ये होत असलेली वाढ यामुळे जीवनावश्यक वस्तूंवर डोळा ठेवून चोरीचे प्रकार वाढत असल्याची चर्चा व्यापारी वर्गात आहे. सोयाबीन तेलाच्या वाढत्या मागणीमुळे त्याची बाजारातील किंमत वाढली असून त्याचा फायदा घेण्यासाठीच ही चोरी करण्यात आल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
दरम्यान, पोलिसांकडून परिसरातील संशयितांची चौकशी सुरू असून लवकरच आरोपींना अटक करण्यात येईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे. या घटनेमुळे व्यापाऱ्यांनी सुरक्षाव्यवस्था अधिक मजबूत करण्याची गरज व्यक्त केली आहे.



