Home धर्म-समाज वासुदेव जेष्ठ नागरिक संघाचे सवलतीत तीर्थाटन

वासुदेव जेष्ठ नागरिक संघाचे सवलतीत तीर्थाटन


भुसावळ-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । ज्येष्ठ नागरिकांना धार्मिक पर्यटनाची संधी स्वस्त आणि सुरक्षित दरात उपलब्ध करून देणाऱ्या राज्य शासनाच्या योजनेचा लाभ घेत भुसावळ शहरातील वासुदेव जेष्ठ नागरिक संघाचे सदस्य शेगाव येथे श्री गजानन महाराजांच्या दर्शनासाठी रवाना झाले. ‘हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे – एसटी संगे तीर्थाटन योजना’ अंतर्गत ही सहल आयोजित करण्यात आली असून शहरातील ज्येष्ठ नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले.

भुसावळ येथील ओम सिद्धगुरु नित्यानंद प्रतिष्ठान संचलित “वासुदेव जेष्ठ नागरिक संघा”चे सुमारे ४४ सभासद आज सकाळी शेगाव येथे गजानन महाराज यांच्या दर्शनासाठी रवाना झाले. बस रवाना करताना “गण गण गणात बोते”च्या जयघोषात वातावरण भक्तिमय झाले होते. प्रभाकर झांबरे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून एसटी बसला शुभारंभ करण्यात आला. यावेळी वाहन चालक एन. एस. कोळी, संघाचे संयोजक डॉ. नितू पाटील तसेच इतर सर्व सभासद उपस्थित होते.

या प्रसंगी संजय सावकारे यांनी या उपक्रमाचे कौतुक करत सांगितले की, राज्य मार्ग परिवहन महामंडळाने सुरू केलेली ‘महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे एसटी संगे तीर्थाटन सेवा’ ही योजना ज्येष्ठ नागरिकांसाठी अत्यंत लाभदायक ठरत आहे. ४० प्रवाशांचा गट तयार झाल्यास महिलांना आणि ज्येष्ठ नागरिकांना मूळ तिकिटावर ५० टक्के सवलत दिली जाते, तर ७५ वर्षांवरील नागरिकांना विनामूल्य प्रवासाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. आगारनिहाय बसेस आरक्षित करून सुरक्षित प्रवासाची हमी दिली जाते, असेही त्यांनी नमूद केले.

“स्वस्त आणि सुरक्षित” या ब्रीदवाक्यावर आधारित या योजनेचा मुख्य उद्देश सर्वसामान्यांना परवडणाऱ्या दरात धार्मिक पर्यटनाची अनुभूती देणे हा आहे. ज्येष्ठ नागरिकांना सामाजिक, सांस्कृतिक आणि आध्यात्मिक समाधान मिळावे, यासाठी अशा सहली उपयुक्त ठरतात. संघाचे संयोजक डॉ. नितू पाटील हे अभ्यासू आणि चिकित्सक वृत्तीचे असून ते ज्येष्ठ नागरिकांसाठी विविध उपक्रम सातत्याने राबवत असतात, अशी माहिती यावेळी देण्यात आली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सतीश जंगले यांनी केले, तर प्रस्तावना डॉ. नितू पाटील यांनी मांडली आणि आभार प्रदर्शन प्रकाश पाटील यांनी केले. सर्व ज्येष्ठ नागरिक उत्साहाने आणि आनंदी वातावरणात तीर्थयात्रेसाठी रवाना झाले.


Protected Content

Play sound