मुंबई-वृत्तसेवा | राज्यातील अलीकडील राजकीय घडामोडींना वेग आला असून राज्यसभा निवडणूक बिनविरोध झाल्यानंतर विधान परिषदेत विरोधी पक्षनेतेपदावर मोठा राजकीय निर्णय होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ठाकरे गटाच्या अंबादास दानवे यांची जागा रिक्त झाल्यानंतर विरोधी पक्षनेतेपदही रिक्त होणार असून त्या पदावर काँग्रेसचे सतेज पाटील यांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
दरम्यान, भारतीय जनता पक्ष आणि महायुतीकडून या पदासंदर्भात नवीन राजकीय रणनीती आखली जात असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मे महिन्यात विधान परिषदेच्या एकूण नऊ जागा रिक्त होणार आहेत. त्यामध्ये भाजपच्या चार, तर शिवसेना, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरद पवार गट) यांच्या प्रत्येकी एका जागेचा समावेश आहे.

विधान परिषद निवडणुकीसाठी २९ मतांचा कोटा निश्चित करण्यात येणार आहे. विद्यमान संख्याबळानुसार महायुतीला आठ जागा मिळण्याची शक्यता आहे, तर महाविकास आघाडीच्या वाट्याला केवळ एक जागा येण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे. त्यामुळे विरोधी पक्षनेतेपदाच्या निवडीवर या निवडणुकीच्या निकालाचा थेट परिणाम होणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत.
राज्यसभा निवडणूक बिनविरोध झाल्यास त्यानंतर विधान परिषदेत विरोधी पक्षनेतेपदाचा निर्णय घेतला जाऊ शकतो. सध्या विधान परिषदेत काँग्रेस आणि शिवसेनेकडे प्रत्येकी सहा सदस्य आहेत, तर शरद पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडे तीन सदस्य आहेत. या पार्श्वभूमीवर संख्याबळ आणि राजकीय समीकरणांचा विचार करून विरोधी पक्षनेतेपद काँग्रेसकडे जाण्याची शक्यता बळावली आहे.
राजकीय सूत्रांच्या माहितीनुसार, राज्यसभा आणि विधान परिषद निवडणुकीतील जागावाटपाच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून विरोधी पक्षनेतेपदाबाबत रणनीती आखली जात आहे. महायुतीचे संख्याबळ मजबूत असल्याने विरोधकांच्या गोटात अस्वस्थता वाढली आहे.
अशा परिस्थितीत अंबादास दानवे यांच्या रिक्त होणाऱ्या जागेनंतर विरोधी पक्षनेतेपदावर सतेज पाटील यांची नियुक्ती होण्याची शक्यता सर्वाधिक असल्याचे बोलले जात असून, अंतिम निर्णय राज्यसभा निवडणुकीनंतर स्पष्ट होणार आहे.



