जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जळगावकर चित्रपटप्रेमींसाठी पर्वणी ठरणारा ५ वा आंतरराष्ट्रीय देवगिरी शॉर्ट फिल्म फेस्टिवल २८ फेब्रुवारी व १ मार्च २०२६ रोजी उत्साहात रंगणार असून तयारी अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. चित्रपट, माहितीपट, कॅम्पस फिल्म, बालचित्रपट, मास्टर क्लास, चर्चासत्रे आणि सांस्कृतिक कार्यक्रमांनी सजलेला हा दोन दिवसीय महोत्सव यंदा अधिक भव्य स्वरूपात आयोजित करण्यात आला आहे.
Ajintha Film Society आणि Kanha Lalit Kala Kendra यांच्या संयुक्त विद्यमाने हा महोत्सव एम. जे. कॉलेज परिसरातील कान्ह ललित कला केंद्र येथे संपन्न होत आहे. देशातील २० राज्यांमधून तसेच विदेशातून आलेल्या शॉर्ट फिल्म्सपैकी तज्ज्ञ परीक्षकांनी निवडलेल्या ८० उत्कृष्ट चित्रपटांचे अधिकृत प्रदर्शन या महोत्सवात होणार आहे. सुमारे ३०० युवा फिल्ममेकर जळगावात सहभागी होत असून शहरात चित्रपटसृष्टीचा माहोल निर्माण झाला आहे.

महोत्सवाच्या निमित्ताने संपूर्ण परिसराला ‘दादासाहेब फाळके चित्र नगरी’ असे नाव देण्यात आले आहे. स्क्रिनिंग सभागृहांना Dharmendra, Sandhya Shantaram आणि Priya Marathe यांची नावे देण्यात आली आहेत. २८ फेब्रुवारी रोजी सकाळी ९ वाजता स्क्रिनिंगसह महोत्सवाचा शुभारंभ होईल. दुपारच्या सत्रात ज्येष्ठ चित्रपट अभ्यासक अभिजित गोखले ‘चित्रपट आणि समाज जागरण’ या विषयावर मास्टर क्लास घेणार आहेत, तर सायंकाळी ‘रंगभूमी ते चित्रपटसृष्टी: एक प्रवास’ या विषयावर ज्येष्ठ अभिनेते Manoj Joshi मार्गदर्शन करणार आहेत.
सायंकाळी ५ वाजता वंदे मातरम् सभागृहात महाराष्ट्र राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री अॅड. आशिष शेलार, पालकमंत्री गुलाबराव पाटील आदी मान्यवरांच्या उपस्थितीत भव्य उद्घाटन सोहळा पार पडेल. शोमॅन Raj Kapoor यांच्या जन्मशताब्दी निमित्त विशेष कार्यक्रम सादर होणार असून यावेळी मनोज जोशी यांना यंदाचा मानाचा ‘देवगिरी चित्रतपस्वी’ पुरस्कार प्रदान करण्यात येईल.
सायंकाळी ७ वाजता टुरिंग टॉकीज सत्रात दिग्दर्शक Digpal Lanjekar दिग्दर्शित ‘संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई’ हा चित्रपट बास्केटबॉल मैदानावर प्रदर्शित होईल. चित्रपटानंतर दिग्पाल लांजेकर रसिकांशी मुक्तसंवाद साधणार आहेत. १ मार्च रोजी सकाळपासून तिन्ही सभागृहात स्क्रिनिंग सुरू राहील. ‘दिग्दर्शकाच्या नजरेतून छत्रपती शिवराय’ या विषयावर दिग्पाल लांजेकर यांची प्रकट मुलाखत होणार आहे. दुपारी अभिनेते योगेश सोमण आणि दिग्दर्शक अतुल गंगवार युवा फिल्ममेकर्सना चित्रनिर्मिती प्रक्रियेवरील मार्गदर्शन करतील.
ओपन फोरम सत्रात सुप्रसिद्ध अभिनेते Aroh Velankar आणि अभिनेत्री Surbhi Hande युवकांशी संवाद साधणार आहेत. समारोप सत्रात वस्त्रोद्योग मंत्री ना. संजय सावकारे, दिग्दर्शक शिवाजी लोटन पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत. यावेळी आरोह वेलणकर आणि सुरभी हांडे यांना ‘देवगिरी चित्रगौरव’ पुरस्कार प्रदान करण्यात येणार असून सर्वोत्कृष्ट शॉर्ट फिल्म, कॅम्पस फिल्म व माहितीपटांसाठी सामूहिक आणि वैयक्तिक पारितोषिकांचे वितरण होईल.
महोत्सवाच्या आयोजनासाठी सांस्कृतिक मंत्रालय, महाराष्ट्र शासन, फिल्म सिटी, जैन उद्योग समूह आणि श्री रामलाल चौबे ट्रस्ट यांचे सहकार्य लाभले आहे. विशेष म्हणजे हा संपूर्ण महोत्सव सर्व नागरिक व चित्रपट क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या तरुणांसाठी पूर्णपणे मोफत खुला आहे. आयोजकांनी जळगावकरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या चित्रमहोत्सवाचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे.



