जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । राज्यसभा खासदार तथा ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम यांच्या जीवनप्रवासावर आधारित ‘प्रहार’ या आगामी चित्रपटाच्या निमित्ताने अभिनेता राजकुमार राव, अभिनेत्री वामिका गब्बी आणि स्वतः खासदार उज्ज्वल निकम रविवार, ११ ऑक्टोबर २०२६ रोजी जळगाव शहरात उपस्थित राहणार आहेत. या विशेष कार्यक्रमामुळे जळगावकर रसिकांना चित्रपटातील कलाकारांशी थेट संवाद साधण्याची संधी मिळणार आहे.
‘प्रहार’ चित्रपटात अभिनेता राजकुमार राव आणि अभिनेत्री वामिका गब्बी यांच्या प्रमुख भूमिका आहेत. ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम यांच्या जीवनातील विविध पैलू, त्यांचा कार्यप्रवास आणि न्यायव्यवस्थेतील योगदान यांवर आधारित या चित्रपटाबाबत प्रेक्षकांमध्ये उत्सुकता आहे. चित्रपटाच्या निमित्ताने प्रमुख कलाकारांसह उज्ज्वल निकम यांची उपस्थिती जळगावकरांसाठी विशेष आकर्षण ठरणार आहे. या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर रविवारी सायंकाळी ४.४५ वाजता छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापासून छत्रपती संभाजी नाट्यगृहापर्यंत मोटारसायकल रॅली काढण्यात येणार आहे. या रॅलीतून चित्रपटाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमाची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचविण्यात येणार आहे. कार्यक्रमादरम्यान राजकुमार राव आणि वामिका गब्बी यांच्याशी ‘प्रहार’ चित्रपटाबाबत संवाद साधण्याची संधी जळगावकर रसिकांना मिळणार आहे. तसेच खासदार उज्ज्वल निकम यांची उपस्थितीही या कार्यक्रमाचे महत्त्व वाढविणारी ठरणार आहे.

या कार्यक्रमाचे आयोजन ‘खासदार उज्ज्वल निकम कार्यक्रम मित्र परिवार समिती’ यांच्या वतीने करण्यात आले आहे. जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन हे समितीचे अध्यक्ष आहेत. नंदकुमार बेंडाळे, भरत अमळकर, अनिश शहा, अनिल कांकरिया, युसुफ मकरा, डॉ. रेखा महाजन, डॉ. राजेश पाटील, किरण बच्छाव, प्रकाश पाटील, अमर कुकरेजा, ॲड. भरत देशमुख, रोहित निकम, जितेंद्र लाठी, प्रसाद सूर्यवंशी, राहुल पवार, प्रतीक्षा सोनवणे, विराज कावडिया आणि हर्षल पाटील हे समितीचे प्रमुख सदस्य आहेत. पत्रकार परिषदेत समितीचे अध्यक्ष अशोक जैन यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी या कार्यक्रमाची माहिती दिली. जळगावकरांसाठी हा विशेष कार्यक्रम खुला असून, नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन समितीच्या वतीने करण्यात आले आहे.



