Home Cities जळगाव शिवरायांची युद्धनीती आजही जागतिक लष्करी प्रशिक्षणासाठी आदर्श : डॉ. तुषार रायसिंग

शिवरायांची युद्धनीती आजही जागतिक लष्करी प्रशिक्षणासाठी आदर्श : डॉ. तुषार रायसिंग


जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । छत्रपती शिवाजी महाराजांची युद्धनीती ही केवळ इतिहासापुरती मर्यादित नसून आजच्या आधुनिक लष्करी प्रशिक्षणालाही दिशा देणारी आहे, असे प्रतिपादन डॉ. तुषार रायसिंग यांनी केले. जळगाव येथील रसायन तंत्रज्ञान संस्थेत शिवजयंतीनिमित्त आयोजित व्याख्यानात त्यांनी महाराजांच्या रणतंत्राचा जागतिक संदर्भासह सखोल उहापोह केला.

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ संचलित रसायन तंत्रज्ञान संस्था (UICT), जळगाव येथे आयोजित कार्यक्रमात डॉ. रायसिंग मुख्य वक्ते म्हणून बोलत होते. त्यांनी सांगितले की, छत्रपती शिवाजी महाराज यांची गनिमी काव्याची युद्धनीती आजही जगातील प्रगत देशांच्या लष्करी अभ्यासक्रमाचा भाग आहे. अमेरिकेतील West Point Military Academy आणि इंग्लंडमधील Royal Naval Academy सारख्या नामांकित संस्थांमध्ये शिवरायांच्या रणनीतीचा अभ्यास केला जातो, असे त्यांनी नमूद केले. विशेष म्हणजे, व्हिएतनाम युद्धाच्या काळात उत्तर व्हिएतनामच्या सैन्याने अमेरिकेसारख्या महासत्तेविरुद्ध लढताना गनिमी काव्याच्या तत्त्वांचा प्रभावी वापर केल्याचा उल्लेखही त्यांनी केला.

व्याख्यानात डॉ. रायसिंग यांनी महाराजांच्या विविध लष्करी मोहिमांचा ऊहापोह केला. लाल महालावरील धाडसी छाप्याचे नियोजन, प्रतापगडच्या लढाईत अफजल खानावर मिळवलेला विजय आणि त्यामागील मानसशास्त्रीय डावपेच यांचे त्यांनी उदाहरणांसह विश्लेषण केले. मर्यादित संसाधनांचा अचूक वापर, प्रभावी गुप्तचर जाळे आणि वेगवान निर्णयक्षमता हे महाराजांच्या यशाचे प्रमुख घटक असल्याचे त्यांनी सांगितले.

सुरतेवरील स्वारीमागील आर्थिक व सामरिक उद्देश स्पष्ट करताना त्यांनी ‘मराठा आरमार’ उभारणीचा दूरदृष्टीपूर्ण विचार मांडला. समुद्रकिनाऱ्यावरील किल्ल्यांची साखळी, त्यांची अभेद्य रचना आणि भू-सामरिक नियोजन आजही अभियांत्रिकी व संरक्षण अभ्यासकांसाठी संशोधनाचा विषय असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. राजकुमार सिरसाम होते. आपल्या अध्यक्षीय भाषणात त्यांनी विद्यार्थ्यांना आवाहन केले की, इतिहास केवळ वाचनापुरता मर्यादित न ठेवता शिवविचारांचे आचरण जीवनात करावे. राष्ट्रनिर्मितीसाठी सशक्त व्यक्तिमत्त्व घडवणे हीच महाराजांना खरी आदरांजली ठरेल, असे ते म्हणाले.

कार्यक्रमाची सुरुवात प्रा. निलेश कुलकर्णी यांनी सादर केलेल्या जोशपूर्ण पोवाड्याने झाली. प्रा. डॉ. भूषण चौधरी यांनी प्रास्ताविक केले, तर सूत्रसंचालन प्रा. विश्वराज तायडे यांनी केले. कार्यक्रमास संस्थेतील प्राध्यापक, कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. संपूर्ण कार्यक्रमात शिवजयंतीनिमित्त उत्साही व प्रेरणादायी वातावरण निर्माण झाले होते.


Protected Content

Play sound