Home Uncategorized लेवा पाटीदार समाजाचा भव्य सामूहिक विवाह सोहळा; ९० लोकप्रतिनिधींचा होणार सन्मान

लेवा पाटीदार समाजाचा भव्य सामूहिक विवाह सोहळा; ९० लोकप्रतिनिधींचा होणार सन्मान


जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । येथे अखिल भारतीय लेवा पाटीदार युवक महासंघ व बहिणाई ब्रिगेड यांच्या संयुक्त विद्यमाने लेवा पाटीदार समाजाचा भव्य सामूहिक विवाह सोहळा आणि नवनिर्वाचित लोकप्रतिनिधींचा सन्मान सोहळा रविवार, २२ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ११ वाजता मीराई लॉन येथे आयोजित करण्यात आला आहे. या सोहळ्यात समाजातील २५ वधू-वर वैदिक पद्धतीने विवाहबंधनात अडकणार असून जिल्ह्यातील महापौर, नगराध्यक्ष, नगरसेवक आणि नगरसेविकांचा सन्मान करण्यात येणार आहे.

काशीबाई उखाजी कोल्हे शाळेसमोर, एस.टी. बस डेपो शेजारी असलेल्या मीराई लॉन येथे हा भव्य सोहळा पार पडणार आहे. कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष म्हणून आ. राजू मामा भोळे हे जबाबदारी सांभाळणार असून दीपप्रज्वलन माजी महसूल मंत्री तथा आमदार एकनाथ खडसे यांच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमाला केंद्रीय युवा विकास व क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे, माजी खासदार डॉ. उल्हासराव पाटील, आमदार अमोल जावळे, माजी आमदार शिरीष चौधरी, महापौर दीपमाला काळे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

या सामूहिक विवाह सोहळ्यात २५ वधू-वरांचा वैदिक मंत्रोच्चारात शुभमंगल सोहळा संपन्न होणार आहे. समाजातील विवाह सोहळे साधेपणाने व कमी खर्चात पार पडावेत, समाजात एकोपा वाढावा आणि नवदाम्पत्यांना समाजाचा आशीर्वाद मिळावा, हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश असल्याचे आयोजकांनी सांगितले. याचवेळी जळगाव जिल्ह्यातील लेवा पाटीदार समाजातील नवनिर्वाचित महापौर, नगराध्यक्ष, नगरसेवक व नगरसेविकांचा गौरव करून त्यांचा सत्कार करण्यात येणार आहे.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी विविध समित्यांची स्थापना करण्यात आली आहे. अखिल भारतीय लेवा पाटीदार युवक महासंघाचे अध्यक्ष अॅड. प्रकाशराव पाटील, आयोजन समितीचे अध्यक्ष तथा प्रदेशाध्यक्ष प्रदीप उर्फ बंडू भोळे, बहिणाई ब्रिगेडच्या प्रदेशाध्यक्षा आशाताई कोल्हे, उपाध्यक्षा हर्षा बोरोले, जिल्हाध्यक्षा सुनीता येवले, महानगराध्यक्षा वैशाली झोपे यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते परिश्रम घेत आहेत.

तसेच महासंघाचे महानगराध्यक्ष महेश चौधरी, मधुकर भंगाळे, प्रदीप रोटे, अविनाश भोळे, सागर चौधरी, सुरेश फालक, अतुल महाजन, सुणवंत झोपे आणि इतर कार्यकर्ते नियोजनात सक्रिय सहभाग घेत असून कार्यक्रम भव्य स्वरूपात पार पडण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

 


Protected Content

Play sound