Home Cities जळगाव डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात अवतरली शिवशाही

डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात अवतरली शिवशाही


जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जळगाव येथील डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय येथे शिवजयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमाने जणू शिवशाही अवतरल्याची अनुभूती विद्यार्थ्यांना आणि उपस्थितांना दिली. स्वराज्य बॅचतर्फे आयोजित ‘शिवपर्व-२०२६’ अंतर्गत पथनाट्य, भव्य मिरवणूक आणि महाआरतीच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांचा प्रेरणादायी संदेश प्रभावीपणे सादर करण्यात आला.

हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रमाची सुरुवात गोदावरी फाउंडेशनचे अध्यक्ष माजी खासदार डॉ. उल्हास पाटील यांच्या हस्ते महाआरतीने झाली. यावेळी वैद्यकीय महाविद्यालयाचे संचालक डॉ. एन. एस. आर्विकर, डीन डॉ. प्रशांत सोळंके, रजिस्ट्रार प्रमोद भिरूड, काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष उदय पाटील, हृदयविकार तज्ज्ञ डॉ. वैभव पाटील, डॉ. माया आर्विकर, प्रा. डॉ. बापूराव बिटे, डॉ. विजय बाविस्कर, आशिष भिरूड, गोपाळ भोळे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

शिवजयंतीनिमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकीत छत्रपती शिवाजी महाराजांचा सजीव देखावा साकारण्यात आला होता. महाराजांची वेशभूषा निसर्ग भैराम यांनी साकारत उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. तसेच वारकरी संप्रदायाची परंपरा दर्शवणारा देखावाही सहभागी होता. विठ्ठलाची वेशभूषा निरज वाठोरे यांनी, तर रुख्मिणीची वेशभूषा आरती बेले या विद्यार्थीनीने साकारली. ढोल-ताशांच्या गजरात निघालेल्या मिरवणुकीने संपूर्ण परिसर उत्साहाने भारावून गेला. “जय भवानी, जय शिवाजी”च्या घोषणांनी वातावरण दणाणून गेले.

कार्यक्रमातील विशेष आकर्षण ठरले ते एमबीबीएस द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेले जनजागृतीपर पथनाट्य. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यातील सुशासनाची तुलना आजच्या सामाजिक समस्यांशी करत विद्यार्थ्यांनी प्रभावी संदेश दिला. स्त्री अत्याचार, व्यसनाधीन तरुणाई, आई-वडिलांना वृद्धाश्रमात पाठविण्याची प्रवृत्ती आणि शेतकऱ्यांच्या कष्टाचे मोल या विषयांवर भाष्य करत समाजप्रबोधनाचा प्रयत्न करण्यात आला. या पथनाट्यात पियूष बिसेन, सुदेश शिंदे, पुष्कर लोंढे, मिहीर पाटील, कृणाल छोले, सिद्धेश वंजारी, पार्थ वैद्य, वेदांत वानवे, अमितेश मडसे, शिलान नगराळे, ऐश्वर्या रत्नपारखी, निशिका मंडोरे, संजीवनी जाधव, आकांक्षा पवार, विश्रृता चव्हाण आणि आयुषी बकाने यांनी सहभाग घेतला. त्यांच्या प्रभावी अभिनयाला उपस्थितांकडून दाद मिळाली.

विद्यार्थ्यांच्या सहभागातून साकारलेला हा कार्यक्रम केवळ उत्सवापुरता मर्यादित न राहता सामाजिक भान जागवणारा ठरला. शिवरायांच्या आदर्शांचा आधुनिक काळाशी संबंध जोडत विद्यार्थ्यांनी स्वराज्याचा संदेश नव्या पिढीपर्यंत पोहोचवला.


Protected Content

Play sound