खामगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । खामगाव येथील शासकीय तंत्रनिकेतन खामगावमध्ये दरवर्षीप्रमाणे यंदाही वार्षिक सांस्कृतिक महोत्सव ‘कलासंगम-२०२६ : सृजनोत्सव’ मोठ्या उत्साहात आणि दिमाखदार वातावरणात संपन्न झाला. तंत्रशिक्षणासोबतच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना देण्याच्या उद्देशाने आयोजित या महोत्सवाने कॅम्पसमध्ये सृजनशीलतेचा अविस्मरणीय उत्सव साकारला.
संस्थेमध्ये नियमित अभ्यासक्रमासोबत सहशैक्षणिक उपक्रम, आंतरपदविका क्रीडा स्पर्धा आणि विविध स्पर्धांचे सातत्याने आयोजन केले जाते. त्याच परंपरेचा भाग म्हणून ‘कलासंगम-२०२६’च्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात आले. तंत्रज्ञानाच्या शिक्षणासोबत कला, संस्कृती आणि सर्जनशीलतेचा संगम घडवून आणणाऱ्या या उपक्रमाने उपस्थितांची मने जिंकली.

या महोत्सवाचे उद्घाटन राज्याचे कामगार मंत्री ॲड. आकाश फुंडकर यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने करण्यात आले. उद्घाटनप्रसंगी बोलताना त्यांनी विद्यार्थ्यांनी तंत्रशिक्षणासोबतच सांस्कृतिक आणि सामाजिक क्षेत्रातही सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन केले. “आजच्या स्पर्धात्मक युगात केवळ पुस्तकी ज्ञान पुरेसे नाही; व्यक्तिमत्त्व विकासासाठी कला आणि संस्कृतीची जोड अत्यावश्यक आहे. ग्रामीण भागातील शासकीय तंत्रनिकेतनसारखी संस्था तंत्रज्ञांना जागतिक दर्जाचे व्यासपीठ उपलब्ध करून देत आहे, ही अभिमानास्पद बाब आहे,” असे ते म्हणाले.
कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून जी.एस. कॉलेज, खामगावचे प्राचार्य डॉ. धनंजय तळवणकर उपस्थित होते. त्यांनी आपल्या मार्गदर्शनातून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी कला आणि संस्कृतीचे महत्त्व अधोरेखित केले. तंत्रज्ञान आणि कलेचा संगम साधल्यास नाविन्यपूर्ण निर्मिती शक्य होते, असे सांगत त्यांनी विद्यार्थ्यांना ध्येयप्रेरित राहण्याचा संदेश दिला. “सृजनोत्सव हा केवळ मनोरंजनाचा कार्यक्रम नसून संघभावना आणि नेतृत्वगुण विकसित करण्याची शाळा आहे,” असे ते म्हणाले.
मंचावर पॉन्डीचेरी येथे ‘इमिनेन्ट इंजिनियर अवॉर्ड’ विजेते व स्थापत्य अभियंता असोसिएशनचे सचिव शशांक देशपांडे यांची विशेष उपस्थिती लाभली. त्यांच्या उपस्थितीने विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे प्राचार्य डॉ. समीर प्रभुणे विराजमान होते. आपल्या अध्यक्षीय भाषणात त्यांनी महाविद्यालयाच्या प्रगतीचा आढावा घेत विद्यार्थ्यांच्या कलागुणांचे कौतुक केले. “आमचे विद्यार्थी केवळ कुशल अभियंतेच नव्हे तर संवेदनशील कलाकार आणि जबाबदार नागरिक म्हणून घडत आहेत, याचा आम्हाला अभिमान आहे,” असे त्यांनी नमूद केले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन व सरस्वती पूजन संपन्न झाले. प्रास्ताविक समन्वयक प्रा. अमेय पाटील यांनी सादर केले, तर आभार प्रदर्शन सह-समन्वयक प्रा. सोहन चोपडे यांनी व्यक्त केले. यावेळी जिमखाना उपाध्यक्ष प्रा. सागर जुमडे, सचिव प्रा. रंगनाथ गिऱ्हे, विविध विभागप्रमुख, विद्यार्थी जिमखाना सचिव ओम करवंदे आणि वार्षिक सांस्कृतिक कार्यक्रम सचिव कु. गौरी वाळके यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. मंत्री महोदयांच्या हस्ते माजी विद्यार्थी संघटनेतर्फे गुणवंत विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रे, रोख पारितोषिके, शिष्यवृत्ती आणि विविध प्रकारची मदत प्रदान करण्यात आली.
‘सृजनोत्सव’ अंतर्गत विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या मॉडेल्स, चित्रकला आणि हस्तकला वस्तूंचे आकर्षक प्रदर्शन भरविण्यात आले. तसेच इतिहास अभ्यासक शेखरजी खोमने यांच्या जुन्या नाणी, टपाल तिकिटे आणि दुर्मीळ पुस्तकांचे विशेष प्रदर्शनही आयोजित करण्यात आले होते. दुपारच्या आणि सायंकाळच्या सत्रांमध्ये शैक्षणिक व क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला.
कलेचा जागर साजरा करत विद्यार्थ्यांनी पारंपरिक वेशभूषा स्पर्धा, रांगोळी, एकांकिका, एकपात्री प्रयोग, स्टँडअप कॉमेडी, गीतगायन, विविध नृत्यप्रकार, कविता वाचन आणि आनंद मेळावा यांसारखे नाविन्यपूर्ण कार्यक्रम सादर केले. विजेत्या व उपविजेत्या विद्यार्थ्यांना तत्काळ पदके व प्रमाणपत्रे प्रदान करण्यात आली. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी समन्वयक प्रा. अमेय पाटील, सह-समन्वयक प्रा. सोहन चोपडे, प्रा. मानस घोडले, जिमखाना पदाधिकारी, विविध समित्यांचे सदस्य, विद्यार्थी स्वयंसेवक तसेच अधिकारी व कर्मचारी यांनी अथक परिश्रम घेतल्याची माहिती जनसंपर्क अधिकारी प्रा. राजेश मंत्री यांनी दिली.



