जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । मेरा युवा भारत, जळगाव यांच्या वतीने कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ येथे १८ ते २४ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत आंतरजिल्हा युवा आदान-प्रदान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात मुंबई जिल्ह्यातील ३७ युवक-युवती सहभागी झाले असून कार्यक्रमाचा शुभारंभ उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.
कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा क्रीडा अधिकारी रवींद्र नाईक, गोदावरी फाउंडेशनच्या संचालिका डॉ. केतकी पाटील तसेच राष्ट्रीय सेवा योजनेचे संचालक डॉ. व्ही. एम. रोकडे उपस्थित होते.

याप्रसंगी मार्गदर्शन करताना श्री. नाईक यांनी मोबाईल व्यसनाचे दुष्परिणाम अधोरेखित करत युवकांनी शारीरिक तंदुरुस्तीला प्राधान्य द्यावे, नियमित व्यायाम करावा व निरोगी जीवनशैली अंगीकारावी, असे आवाहन केले. डॉ. केतकी पाटील यांनी जळगाव जिल्ह्याच्या समृद्ध खाद्यसंस्कृतीची माहिती देत विद्यार्थ्यांनी ग्रामीण भागाला भेट देऊन शेती, पीकपद्धती आणि ग्रामीण जीवनशैलीचा प्रत्यक्ष अनुभव घ्यावा, असे सुचविले.
तर डॉ. रोकडे यांनी जळगाव जिल्ह्यातील पारंपरिक लोककला व सांस्कृतिक वारशाचा आढावा घेत साने गुरुजी आणि कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या साहित्यिक व सामाजिक कार्याची माहिती दिली.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात जिल्हा युवा अधिकारी अभिषेक चवरे यांनी कार्यक्रमाची उद्दिष्टे स्पष्ट करत आंतरजिल्हा ऐक्य, सांस्कृतिक देवाण-घेवाण, नेतृत्व विकास आणि राष्ट्रीय एकात्मता वृद्धिंगत करण्यासाठी या उपक्रमाचे महत्त्व अधोरेखित केले.
यावेळी मान्यवरांच्या हस्ते सहभागी युवकांना किटचे वितरण करण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी कमलेश सोनवणे व चेतन पाटील यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमादरम्यान विविध सांस्कृतिक सादरीकरणे, शैक्षणिक सत्रे, चर्चासत्रे व क्षेत्रभेटी आयोजित करण्यात येणार असून युवकांमध्ये “एक भारत श्रेष्ठ भारत” या भावनेला बळकटी देण्याचा उद्देश असल्याचे आयोजकांनी सांगितले.



