जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील एमआयडीसी पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या नेरी नाका परिसरात एका रिक्षाचालकावर तिघांनी विनाकारण हल्ला करून त्याला गंभीर जखमी केल्याची घटना सोमवारी १६ फेब्रुवारी रोजी रात्री ८ वाजता घडली आहे. याप्रकरणी मंगळवारी १७ फेब्रुवारी रोजी दुपारी १ वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेली माहिती अशी की, मुन्ना रमजान पिंजारी (वय ३६, रा. बिलाल चौक, तांबापुरा) हे व्यावसायिक रिक्षाचालक आहेत. सोमवारी १६ फेब्रुवारी रोजी रात्री ८ वाजेच्या सुमारास मुन्ना पिंजारी हे आपली रिक्षा (क्र. MH-19-S-2388) घेऊन पाण्याचे जार वाटप करून घरी परतत होते. नेरी नाका परिसरातून जात असताना तीन अनोळखी व्यक्तींनी त्यांची रिक्षा अडवली आणि रिक्षाच्या काचा फोडून नुकसान केले.

जेव्हा रिक्षाचालक पिंजारी यांनी “माझ्या रिक्षाच्या काचा का फोडल्या?” असा जाब विचारला, तेव्हा त्यातील एकाने उद्धटपणे उत्तर दिले. “माझे नाव शुभम आहे आणि मी कासमवाडीचा दादा आहे,” असे म्हणत त्याने पिंजारी यांना धमकावण्यास सुरुवात केली. बाचाबाची वाढत असतानाच आरोपीने स्वतःजवळील धारदार चॉपरने पिंजारी यांच्या कमरेवर आणि पायावर वार केले. या हल्ल्यानंतर आरोपींनी पिंजारी यांना अश्लील शिवीगाळ केली आणि जीवे मारण्याची धमकी दिली. या हल्ल्यात रिक्षाचालक गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील ताास पोहेकॉ प्रमोद लाडवंजारी हे करीत आहे.



