पाचोरा, प्रतिनिधी | शहरात मोकाट जनावरांची संख्या वाढल्याने रहदारीला अडचणी निर्माण होत आहे. अश्या मोकाट गुराढोरांच्या मालकावर दंडात्मक कारवाईची मोहीम पालिका प्रशासनाने हाती घेतली आहे. मागील ४ महिन्यात राबविण्यात आलेल्या मोहिमेत कोंडवाडा विभागाने मोकाट जनावरे ताब्यात घेऊन दंडात्मक कारवाई करत ७४ हजार ६२५ रुपये वसुल केले आहेत.
पाचोरा शहराच्या भाडगाव रोड, नगर पालिका चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, जामनेर रोड , मानसिंगका कॉर्नर ,बस स्टँड रोड ,महाराणा प्रताप चौक,आठवडे बाजार अश्या अनेक मुख्य रस्त्यांवर मोकाट गुरे ढोरे रस्ते अडवून बसतात. त्यामुळे पायी चालणारे नागरिक वाहनधारक यांना रहदारीच्या अडचणी निर्माण होऊन अपघातांची शक्यता वाढली आहे. याची दखल घेत मुख्याधिकारी सोमनाथ आढाव यांनी दिलेल्या आदेशानुसार कोंडवाडा लिपिक अनिल मेघराज पाटील यांनी मोकाट गुरे ढोरे ताब्यात घेण्याची मोहीम राबवून आज ११४ गुरे ढोरे कोंडवाड्यात कोंडून त्यांच्या मालकांवर ७४ हजार ६२५ ऐव्हडी दंडाची रक्कम वसूल केली आहे. तसेच दर आठवड्याला रस्त्यांवर फिरणारे मोकाट कुत्रे पकडण्याची ही मोहीम राबविली जात आहे. मुख्याधिकारी श्री आढाव यांनी नागरिकांच्या आरोग्याच्या व संरक्षणाच्या दृष्टीने घेतलेल्या निर्णयाचे जनतेतून स्वागत व समाधान व्यक्त होत आहे. ही मोहीम यापुढे ही सुरू राहील असे आदेश न.पा. प्रशासनाने दिले आहेत. पशुपालकांनी आप आपली गुरे ढोरे रहदारीला अडथळा निर्माण करणार नाही याची दक्षता घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे.
या कामी उपमुख्याधिकारी राजेंद्र पाटील, आरोग्य निरीक्षक धनराज पाटील, पालिका कर्मचारी ,पोलीस प्रशासनाचे सहकार्य मिळत आहे.