जळगाव लाईव्ह ट्रेंडस नयूज प्रतिनिधी । डिझेल चोरी करून अपघाताचा बनाव रचणाऱ्या एका आंतरराज्य टोळीचा जळगाव स्थानिक गुन्हे शाखेने पर्दाफाश केला आहे. या कारवाईसाठी पथकाने तब्बल २७०० किलोमीटरचा प्रवास करत राजस्थानच्या वाळवंटातून मुख्य आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत. या कारवाईत पोलिसांनी एक स्विफ्ट कार जप्त केली असून, एका आरोपीला अटक करण्यात यश मिळवले आहे.
एरंडोल-पारोळा रोडवरील ‘हॉटेल आनंद’ परिसरात ही घटना १६ जानेवारी रोजी घडली आहे. टँकर चालक भुराराम काळुराम याने आपल्या साथीदारांच्या मदतीने २२ लाख रुपये किमतीचे ३०,००० लिटर डिझेल लंपास केले होते. चोरी लपवण्यासाठी त्यांनी टँकरचा अपघात झाल्याचा खोटा बनाव रचला होता. याप्रकरणी एरंडोल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होता.

LCB चा राजस्थानमध्ये थरार :
पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांनी तपासाची चक्रे फिरवली. तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आरोपींचे लोकेशन राजस्थानमधील बाडमेर येथे असल्याचे समजताच पीएसआय जितेंद्र वल्टे यांचे पथक रवाना झाले. बाडमेर येथील बलदेव नगरमध्ये पोलिसांची चाहूल लागताच मुख्य आरोपी भुराराम याने आपली स्विफ्ट कार (GJ-02-CG-0339) सोडून पळ काढला. त्यानंतर पथकाने होड्डु या वाळवंटी भागातील घरांवर धाड टाकून अस्ला राम भोमाराम (वय ३२) याला शिताफीने अटक केली.
गुन्हेगारी कट आणि कडक कलमे :
तपासात असे समोर आले की, हा केवळ चोरीचा प्रकार नसून पुरावे नष्ट करण्यासाठी रचलेला मोठा कट होता. त्यामुळे आता या गुन्ह्यात गंभीर कलमे वाढवण्यात आली आहेत. न्यायालयाने आरोपीला ७ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. ही यशस्वी कामगिरी पीएसआय जितेंद्र वल्टे, संदीप पाटील, हरीलाल पाटील, प्रवीण मांडोळे, राहुल कोळी आणि तांत्रिक शाखेचे गौरव पाटील व मिलिंद जाधव यांच्या पथकाने बजावली आहे.



