Home क्राईम महावितरणच्या तारा चोरणारी टोळी जेरबंद, १०.५० लाखांचा मुद्देमाल जप्त!

महावितरणच्या तारा चोरणारी टोळी जेरबंद, १०.५० लाखांचा मुद्देमाल जप्त!

0
109

धरणगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । इलेक्ट्रिक पोलवरील महागड्या ॲल्युमिनिअम तारांची चोरी करणाऱ्या एका मोठ्या टोळीचा पाळधी पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या कारवाईत पोलिसांनी मुख्य आरोपीसह दोन विधीसंघर्षित बालकांना ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून चोरीच्या तारा आणि गुन्ह्यात वापरलेली बोलेरो पिकअप असा एकूण १० लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या टोळीने जळगाव जिल्ह्यातील अनेक भागांत अशा प्रकारच्या चोऱ्या केल्याची कबुली दिली असून, यामुळे विजेच्या तारा चोरणाऱ्या एका मोठ्या रॅकेटचे बिंग फुटले आहे.

गुप्त बातमीदाराच्या मदतीने कारवाई :
१४ फेब्रुवारी रोजी धरणगाव पोलीस ठाण्यात विजेच्या तारा चोरीचा गुन्हा दाखल झाला होता. या गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत कंडारे आणि त्यांच्या पथकाने तपास सुरू केला. मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, पथकाने सापळा रचून आरोपींचा पाठलाग केला. १५ फेब्रुवारी रोजी आरोपी अजय बापू गायकवाड (रा. एरंडोल) याला अटक करण्यात आली, तर त्याच्यासोबत असलेल्या दोन विधीसंघर्षित बालकांना ताब्यात घेतले. मात्र, अंधाराचा फायदा घेऊन मनोज गायकवाड, सागर भील आणि भाईदास भील हे तीन आरोपी पळून जाण्यात यशस्वी झाले असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.

साडेदहा लाखांचा मुद्देमाल हस्तगत :
पोलिसांनी आरोपींकडून ४ लाख ५० हजार रुपये किमतीच्या ॲल्युमिनिअम तारा आणि गुन्ह्यात वापरलेली ६ लाख रुपये किमतीची बोलेरो पिकअप गाडी (क्र. MH-04-GF-4172) असा एकूण १० लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

जळगाव जिल्ह्यात मोठे रॅकेट सक्रिय :
अटक केलेल्या आरोपींनी चौकशीदरम्यान धरणगावसह चोपडा, अडावद आणि जळगाव तालुका परिसरात अशाच प्रकारे इलेक्ट्रिक तारांची चोरी केल्याची कबुली दिली आहे. या टोळीने अनेक ठिकाणी हैदोस घातला होता, ज्याचा आता छडा लागला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय बडगुजर करत असून फरार आरोपींना लवकरच अटक केली जाईल, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे. ही यशस्वी कामगिरी सपोनि प्रशांत कंडारे, पोउपनि दत्तात्रय बडगुजर, संघपाल तायडे, योगेश सोनवणे आणि मोहन पाटील यांच्या पथकाने केली आहे.


Protected Content

Play sound