Home Uncategorized गोदावरी प्रीमियर लीगचा किताब सावदा येथील सीबीएसई स्कूलच्या नावावर

गोदावरी प्रीमियर लीगचा किताब सावदा येथील सीबीएसई स्कूलच्या नावावर


जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी ।  गोदावरी संस्थेचे अध्यक्ष तथा माजी खासदार डॉ. उल्हास पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या गोदावरी प्रेसिडेन्शियल प्रीमियर लीग २०२६ क्रिकेट स्पर्धेत सावदा येथील डॉ. उल्हास पाटील इंग्लिश मीडियम सीबीएसई स्कूल संघाने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत विजेतेपद पटकावले. या स्पर्धेमुळे संस्थेतील विविध विभागांतील कर्मचारी आणि शिक्षकांमध्ये क्रीडा भावना आणि एकात्मतेचे वातावरण निर्माण झाले.

गोदावरी संस्थेच्या विविध परिसंस्थांमधील कर्मचारी वर्गासाठी आयोजित करण्यात आलेली ही स्पर्धा यंदा चौथ्या वर्षात पदार्पण करत अधिकच रंगतदार ठरली. एकूण १६ सामने अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले. या स्पर्धेत डॉ. उल्हास पाटील इंग्लिश मीडियम स्कूल सावदा, गोदावरी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, गोदावरी इंग्लिश मीडियम सीबीएसई स्कूल जळगाव, गोदावरी अ‍ॅग्री कॉलेज, गोदावरी लॉ कॉलेज, डॉ. उल्हास पाटील इंग्लिश मीडियम स्कूल भुसावळ, डॉ. उल्हास पाटील मेडिकल कॉलेज आणि डॉ. वर्षा पाटील बीसीए या संघांनी सहभाग नोंदवला.

स्पर्धेतील उपांत्य फेरीचे सामने विशेष चुरशीचे झाले. पहिल्या उपांत्य सामन्यात डॉ. वर्षा पाटील बीसीए आणि डॉ. उल्हास पाटील मेडिकल कॉलेज यांच्यात जोरदार सामना झाला, तर दुसऱ्या उपांत्य सामन्यात सावदा संघाने गोदावरी सीबीएसई जळगाव संघावर मात करत अंतिम फेरीत प्रवेश मिळवला. अंतिम सामन्यात सावदा संघाने उत्कृष्ट फलंदाजी आणि गोलंदाजीचा समन्वय साधत प्रतिस्पर्धी संघावर निर्णायक विजय मिळवला आणि विजेतेपदावर आपले नाव कोरले.

या स्पर्धेमुळे गोदावरी संस्थेच्या विविध शाखांमधील कर्मचारी वर्गामध्ये उत्साह, संघभावना आणि क्रीडा संस्कृतीला चालना मिळाली. स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी आणि आयोजकांनी विशेष परिश्रम घेतले. विजेत्या आणि उपविजेत्या संघांचा सन्मान करून त्यांच्या कामगिरीचे कौतुक करण्यात आले.


Protected Content

Play sound