Home Uncategorized काँग्रेस प्रदेशाध्यक्षांच्या वक्तव्याचा भाजपच्या वतीने तीव्र निषेध; जाहीर माफीची मागणी

काँग्रेस प्रदेशाध्यक्षांच्या वक्तव्याचा भाजपच्या वतीने तीव्र निषेध; जाहीर माफीची मागणी


यावल,लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी : महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांची तुलना टिपू सुलतान यांच्याशी केल्याचे वादग्रस्त विधान केल्याने संपूर्ण तालुक्यात संतापाची लाट उसळली आहे. या विधानाचा निषेध करण्यासाठी भारतीय जनता पार्टीच्या वतीने यावल येथे तीव्र आंदोलन करण्यात आले. यावेळी भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी तहसीलदार मोहनमाला नाझिरकर यांना निवेदन सादर करून सपकाळ यांनी संपूर्ण महाराष्ट्राची जाहीर माफी मागावी, अशी मागणी केली.

तहसील कार्यालयात मोठ्या संख्येने जमलेल्या कार्यकर्त्यांनी काँग्रेस विरोधात जोरदार घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडला. भाजप सरचिटणीस ज्ञानेश्वर तायडे आणि वैद्यकीय आघाडीचे जिल्हाध्यक्ष डॉ. कुंदन फेगडे यांनी यावेळी आपल्या भावना व्यक्त केल्या. छत्रपती शिवाजी महाराज हे अखंड भारताचे आराध्य दैवत असून त्यांची तुलना कोणाशीही करणे हा इतिहासाचा अवमान आहे. केवळ राजकीय फायद्यासाठी महापुरुषांचा अपमान करणे ही काँग्रेसची जुनीच परंपरा असल्याचा घणाघाती आरोप त्यांनी यावेळी केला. सपकाळ यांच्या वक्तव्यामुळे महाराष्ट्राच्या जनभावना दुखावल्या गेल्याचेही त्यांनी नमूद केले.

या आंदोलनात भाजप प्रदेश कार्यकारिणी सदस्य हर्षल पाटील, कृऊबा सभापती उज्जैनसिंग राजपूत, ओबीसी मोर्चाचे जिल्हाध्यक्ष नारायण चौधरी यांच्यासह जिल्हा परिषद सदस्या सविता भालेराव, माजी सदस्य प्रभाकर सोनवणे, नंदा महाजन, जयश्री चौधरी यांसारख्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती. हर्षवर्धन सपकाळ यांनी तातडीने माफी न मागितल्यास आगामी काळात हे आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा भाजपने दिला आहे. प्रशासनाने या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन योग्य ती कारवाई करावी, अशी आग्रही विनंती या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.


Protected Content

Play sound