Home Cities जळगाव प्रेरणादायी उपक्रम ; तरसोद जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांना स्पोर्ट्स ड्रेसचे वाटप

प्रेरणादायी उपक्रम ; तरसोद जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांना स्पोर्ट्स ड्रेसचे वाटप


जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जळगाव तालुक्यातील तरसोद येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत आज आनंदोत्सवाचे वातावरण पाहायला मिळाले. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आणि वाढदिवसाचे औचित्य साधत दोन कुटुंबांनी संपूर्ण शाळेतील विद्यार्थ्यांना स्पोर्ट्स ड्रेसचे वाटप केले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाची लाट उसळली असून ग्रामस्थांकडून या सामाजिक बांधिलकीचे कौतुक होत आहे.

तुषार रघुनाथ कोल्हे व योगिता तुषार कोल्हे यांनी त्यांच्या मुलगा ओम तुषार कोल्हे यांच्या वाढदिवसानिमित्त तरसोद जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना स्पोर्ट्स ड्रेस देण्याचा उपक्रम राबवला. त्याचप्रमाणे अजय थॉमस व वैशाली अजय थॉमस यांनी त्यांच्या मुलगी इशिका अजय थॉमस हिच्या वाढदिवसानिमित्त या उपक्रमात सहभाग घेतला. वाढदिवस साजरा करताना समाजोपयोगी कार्य करण्याचा संदेश या निमित्ताने देण्यात आला.

स्पोर्ट्स ड्रेसचे वितरण तरसोद गावचे सरपंच संतोष सावकारे आणि शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा सौ. पुनम पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी मुख्याध्यापक मिलिंद कोल्हे, पदवीधर शिक्षक उज्वला कुलकर्णी, शिक्षक जगदीश जाधव, सुषमा पाटील, जयश्री महाजन, सुनंदा जावळे तसेच पालक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

नवीन स्पोर्ट्स ड्रेस मिळाल्याने विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर समाधान आणि आनंद स्पष्ट दिसत होता. ड्रेसचे फिटिंग, रंगसंगती आणि वर्गनिहाय नियोजन उत्तम प्रकारे करण्यात आले होते. प्रत्येक विद्यार्थ्याला योग्य मापाचा आणि आकर्षक ड्रेस मिळाल्याने त्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला. ड्रेस तयार करणाऱ्या कंपनीबद्दलही पालक आणि विद्यार्थ्यांनी समाधान व्यक्त केले.

तसेच पोपटराव भादू पाटील (माजी मुख्याध्यापक तरसोद) यांचे स्मरणार्थ त्यांचे चिरंजीव यशवंतराव पोपटराव पाटील यांचेकडून 5000 (पाच हजार) रुपये ठिबकसाठी शाळेस सप्रेम भेट दिल्याबद्दल त्यांचे शिक्षक वर्ग व पालकांकडून आभार व्यक्त करण्यात आले.

या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये क्रीडाप्रती आवड निर्माण होण्यास चालना मिळणार असून शाळेच्या उपक्रमांना नवे बळ मिळणार आहे. वाढदिवसासारख्या वैयक्तिक आनंदाच्या क्षणांना सामाजिक स्पर्श देत केलेल्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.


Protected Content

Play sound