
नवी दिल्ली-वृत्तसेवा | दिवंगत नेते अजित पवार यांच्या निधनानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाली आहे. त्यांच्या आकस्मिक जाण्याने राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नेतृत्वाची पोकळी निर्माण झाली असून, राजकीय घडामोडींना वेग आला आहे.

या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार दिल्ली दौऱ्यावर गेल्या. दिल्लीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष प्रफुल पटेल यांच्या निवासस्थानी झालेल्या ‘ब्रेकफास्ट पे चर्चा’ या बैठकीत त्या सहभागी झाल्या. या बैठकीला प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, पार्थ पवार आणि प्रफुल पटेल उपस्थित होते. राज्यसभा खासदारकी आणि पक्षाच्या भविष्यातील धोरणांबाबत या बैठकीत चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
यानंतर सुनेत्रा पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. जवळपास 40 मिनिटे दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली. पंतप्रधान मोदी यांनी अजित पवार यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करत त्यांच्या कार्याचा उल्लेख केला आणि कुटुंबीयांप्रती सहवेदना व्यक्त केल्या. तसेच एनडीएचा घटक पक्ष म्हणून राष्ट्रवादी काँग्रेससोबत ठामपणे उभे राहू, असे आश्वासन त्यांनी दिल्याचे सांगितले जाते. सुनेत्रा पवार यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचीही भेट घेतली.
अजित पवार यांच्या निधनानंतर सुनेत्रा पवार सक्रिय राजकारणात उतरल्या असून, राज्यसभा खासदारकीचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. त्यांच्या जागी पार्थ पवार यांना राज्यसभेत पाठवण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पार्थ पवार यांच्या राजकीय भविष्यावरही दिल्लीतील बैठकीत चर्चा झाल्याचे मानले जाते.
दरम्यान, नुकत्याच झालेल्या 12 जिल्हा परिषद आणि 125 पंचायत समित्यांच्या निवडणुकांमध्ये भाजपने पहिले स्थान मिळवले, तर अजित पवार गट दुसऱ्या क्रमांकावर राहिला. 731 जिल्हा परिषद जागांपैकी भाजपचे 233 सदस्य निवडून आले असून, अजित पवार गटाचे 167 सदस्य विजयी झाले आहेत. यापूर्वी महानगरपालिका आणि नगरपालिका निवडणुकांमध्येही भाजपने मोठे यश मिळवले होते. त्यामुळे महायुतीत भाजप मोठा भाऊ असला तरी अजित पवार गटाचेही राज्याच्या राजकारणात महत्त्व कायम असल्याचे स्पष्ट झाले आहे.



