
मुंबई-वृत्तसेवा | रेल्वेने प्रवास करणाऱ्या कोट्यवधी प्रवाशांसाठी दिलासादायक बातमी आहे. ऑनलाइन तिकीट बुक करताना अनेकदा बँकेतून पैसे कापले जातात; मात्र तांत्रिक अडचणीमुळे तिकीट बुक होत नाही. अशा वेळी रिफंड मिळण्यासाठी ३ ते ७ कामकाजाचे दिवस वाट पाहावी लागत होती. हीच समस्या लक्षात घेऊन आयआरसीटीसीने आपल्या iPay प्लॅटफॉर्मवर ‘Resume/Retry Booking’ हे नवीन फिचर सुरू केले आहे.

आतापर्यंत पेमेंट गेटवे किंवा बँकेच्या सर्व्हरमधील त्रुटींमुळे ट्रान्झॅक्शन फेल झाल्यास प्रवाशांच्या खात्यातून रक्कम वजा व्हायची, पण तिकीट कन्फर्म होत नसे. त्यामुळे प्रवाशांचा वेळ आणि पैसा दोन्ही अडकून पडत होते. ऐनवेळी तिकीट काढणाऱ्यांसाठी ही मोठी अडचण ठरत होती.
नवीन सुविधेमुळे पैसे कापले गेले आणि तिकीट बुक झाले नाही, तरी प्रवासी त्याच दिवशी त्याच रकमेचा वापर करून पुन्हा तिकीट बुक करू शकतात. रिफंडची वाट पाहण्याची गरज नाही. आधीच कापलेली रक्कम ‘रिझ्युम’ करून तिकीट प्रक्रिया पूर्ण करता येणार आहे. मात्र दुसऱ्या प्रयत्नात बुकिंगची रक्कम पहिल्या अयशस्वी व्यवहाराइतकीच असणे आवश्यक आहे.
ही सुविधा आयआरसीटीसीच्या अधिकृत iPay पेमेंट गेटवेचा वापर करणाऱ्या प्रवाशांसाठी लागू आहे. १० फेब्रुवारी २०२६ पासून ही प्रणाली कार्यान्वित झाली आहे. कार्ड, UPI, नेट बँकिंग किंवा डिजिटल वॉलेटद्वारे पेमेंट करणारे प्रवासी या सुविधेचा लाभ घेऊ शकतात. जर दुसऱ्या प्रयत्नातही बुकिंग झाले नाही, तर नियमानुसार रक्कम मूळ खात्यात परत केली जाईल.
या निर्णयामुळे रेल्वेची डिजिटल तिकीट प्रणाली अधिक विश्वासार्ह आणि सोयीस्कर होणार आहे. दररोज लाखो प्रवासी बुकिंग फेल होण्याच्या समस्येला सामोरे जात होते. आता नव्या फिचरमुळे प्रवाशांचा वेळ आणि पैसा दोन्ही वाचणार असून, रेल्वे प्रवासाचा अनुभव अधिक सुलभ होणार आहे.



