Home Cities जळगाव जळगावात अंगणवाडी सेविकांचे जोरदार ठिय्या आंदोलन !

जळगावात अंगणवाडी सेविकांचे जोरदार ठिय्या आंदोलन !


जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । विविध प्रलंबित मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी अंगणवाडी कर्मचारी कृती समितीच्या वतीने आज जळगाव जिल्हा परिषदेवर भव्य मोर्चा काढण्यात आला. आपल्या हक्कांसाठी हजारो अंगणवाडी सेविका आणि मदतनीस रस्त्यावर उतरल्याने जळगाव जिल्हा परिषद परिसर घोषणांनी दणाणून गेला होता. दरम्यान, मागण्यांची दखल न घेतल्यास उद्या, १२ फेब्रुवारी रोजी देशव्यापी संपात सहभागी होण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला.

श्यामाप्रसाद मुखर्जी उद्यानापासून या मोर्चाला सुरुवात झाली. जिल्हा परिषदेवर पोहोचल्यानंतर आंदोलकांनी त्या ठिकाणी ठिय्या धरला. “अतिरिक्त कामे बंद करा”, “मानधन वेळेवर द्या” अशा घोषणांनी कर्मचाऱ्यांनी प्रशासनाचे लक्ष वेधले.

अतिरिक्त कामाचा ताण आणि मानधनाचा प्रश्न आंदोलक महिलांच्या मते, सरकारने अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्यावर चार अतिरिक्त कामांचा भार सोपवला आहे. यामुळे त्यांच्या मूळ कामकाजावर परिणाम होत असून त्यांच्या हक्कांवर गदा येत आहे. विशेष म्हणजे, गेल्या दोन महिन्यांपासून केंद्र सरकारकडून मिळणारे मानधन अद्याप मिळालेले नाही. “महागाईच्या काळात मानधन थकल्यामुळे घर प्रपंच चालवायचा कसा?” असा संतप्त सवाल आंदोलकांनी उपस्थित केला.

प्रशासनाला इशारा कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, प्रशासनाकडून केवळ आश्वासने मिळत आहेत, प्रत्यक्ष कृती होताना दिसत नाही. जर आजच्या आंदोलनानंतरही सकारात्मक निर्णय झाला नाही, तर १२ फेब्रुवारीच्या देशव्यापी संपात जळगाव जिल्ह्यातील सर्व कर्मचारी सहभागी होतील. या संपामुळे अंगणवाड्यांमधील बालकांच्या पोषण आहार योजना आणि इतर आरोग्य सेवा विस्कळीत होण्याची शक्यता आहे. याला सर्वस्वी प्रशासन जबाबदार असेल, असा इशाराही यावेळी देण्यात आला.


Protected Content

Play sound