
मुंबई-वृत्तसेवा | दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनाचे सत्य निश्चितपणे बाहेर येईल, असा ठाम विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे. या प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी त्यांच्या शंकांसंदर्भातील पुरावे तपास यंत्रणांकडे द्यावेत, असे आवाहनही त्यांनी केले.

मुंबईच्या महापौर व उपमहापौर निवडणुकीनंतर पत्रकारांशी संवाद साधताना मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते. अजित पवार यांच्या अपघाती निधनाबाबत रोहित पवार यांनी व्यक्त केलेल्या संशयावर मुख्यमंत्र्यांनी सविस्तर प्रतिक्रिया दिली.
मुख्यमंत्री म्हणाले की, अजित पवार हे महाराष्ट्राचे लाडके व वरिष्ठ नेतृत्व होते. त्यांच्या अपघाताची सखोल व निष्पक्ष चौकशी व्हावी, ही मागणी चुकीची नाही. स्वतः त्यांनीच सर्वप्रथम केंद्र सरकारला पत्र लिहून या प्रकरणी योग्य चौकशीची मागणी केली होती. केंद्रीय नागरी उड्डाण मंत्र्यांनी विशेष चौकशी गठीत केल्याचे पत्रही पाठवले असल्याची माहिती त्यांनी दिली.
सध्या या अपघाताची चौकशी विविध पातळ्यांवर सुरू असल्याचे सांगताना त्यांनी म्हटले की, डीजीसीए, डीजी एव्हिएशन सेफ्टी तसेच सीआयडीकडून तपास सुरू आहे. ब्लॅक बॉक्स सापडला असून आवश्यक तांत्रिक नमुने तपासणीसाठी पाठवले आहेत. पायलट आणि एटीसीमधील संवाद डिजिटल स्वरूपात उपलब्ध असल्याने सर्व बाबींची तपासणी केली जात आहे.
“चौकशी पूर्ण होण्यापूर्वी तर्कवितर्क लढवले तर लोकांच्या मनात संभ्रम निर्माण होतो. भारतीय तपास यंत्रणा आंतरराष्ट्रीय स्तरावरील आहेत. त्यांच्यावर अविश्वास दाखवण्याचे कारण नाही,” असे मुख्यमंत्री म्हणाले.
रोहित पवार यांनी काही मुद्दे मांडले असतील, तर त्यांनी ते संबंधित यंत्रणांकडे पाठवावेत, असे सांगत मुख्यमंत्री म्हणाले की, शंका व्यक्त करणे चुकीचे नाही; मात्र या दुर्दैवी घटनेचे राजकारण होऊ नये. अजित पवार यांच्या मृत्यूचे सत्य बाहेर यावे, अशी सर्वांचीच भावना आहे आणि ते निश्चितपणे बाहेर येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
“आपण अजित पवारांच्या दुर्दैवी मृत्यूचे राजकारण करणार नाही, याची प्रत्येकाने काळजी घेतली पाहिजे,” असे आवाहनही मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी केले.



