Home राजकीय मोठी बातमी : आता सार्वजनिक कार्यक्रमात पूर्ण ‘वंदे मातरम्’ अनिवार्य !

मोठी बातमी : आता सार्वजनिक कार्यक्रमात पूर्ण ‘वंदे मातरम्’ अनिवार्य !


नवी दिल्ली- वृत्तसंस्था । देशाच्या राष्ट्रगानाबाबत केंद्र सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला असून, ‘वंदे मातरम्’च्या सादरीकरणासाठी नवे अधिकृत दिशा-निर्देश जाहीर केले आहेत. वंदे मातरम् रचनेला १५० वर्षे पूर्ण होत असताना, केंद्रीय गृह मंत्रालयाने जारी केलेल्या या नियमांनुसार आता सरकारी कार्यक्रम, शाळा आणि विविध अधिकृत समारंभांमध्ये ‘वंदे मातरम्’चे संपूर्ण सहा कडवे (अंतरे) वाजवणे किंवा गाणे अनिवार्य असेल. या अधिकृत आवृत्तीची कालमर्यादा ३ मिनिटे १० सेकंद निश्चित करण्यात आली आहे.

गृह मंत्रालयाने स्पष्ट केले आहे की, ज्या वेळी ‘वंदे मातरम्’चे वादन किंवा गायन होईल, त्या वेळी उपस्थित सर्वांनी सावधान स्थितीत उभे राहून राष्ट्रगीताचा सन्मान करणे बंधनकारक असेल, अगदी राष्ट्रगीत ‘जन गण मन’प्रमाणे. मात्र, चित्रपटगृहांमध्ये (सिनेमा हॉल) हा नियम लागू होणार नाही, असेही सरकारने स्पष्ट केले आहे.

नव्या प्रोटोकॉलनुसार, जर एखाद्या कार्यक्रमात राष्ट्रगान ‘जन गण मन’ आणि राष्ट्रगीत ‘वंदे मातरम्’ दोन्ही सादर करायचे असतील, तर प्रथम ‘वंदे मातरम्’ आणि त्यानंतर ‘जन गण मन’ वाजवले जाईल. हा नियम सर्व सरकारी कार्यक्रम, शाळा तसेच अधिकृत समारंभांसाठी लागू राहील.

या नियमांची अंमलबजावणी केवळ शासकीय कार्यक्रमांपुरती मर्यादित नसून, पद्म पुरस्कारांसारख्या नागरी सन्मान समारंभांमध्येही ‘वंदे मातरम्’चे वादन बंधनकारक करण्यात आले आहे. राष्ट्रपतींच्या आगमन-प्रस्थानावेळी, त्यांच्या भाषणापूर्वी व नंतर, तसेच राष्ट्राच्या नावाने दिल्या जाणाऱ्या संदेशांच्या आधी व नंतर ‘वंदे मातरम्’ सादर केले जाईल. त्याचप्रमाणे, राज्यपाल किंवा उपराज्यपालांच्या आगमन-प्रस्थानावेळी आणि त्यांच्या भाषणांच्या आधी व नंतरही या अधिकृत सहा कडव्यांच्या आवृत्तीचे पालन करणे आवश्यक असेल.

देशभरातील सर्व शाळांमध्ये दिवसाच्या कामकाजाची सुरुवात सामूहिक राष्ट्रगीत ‘वंदे मातरम्’च्या गायनाने करावी, असे स्पष्ट निर्देश गृह मंत्रालयाने दिले आहेत. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये देशभक्तीची भावना अधिक दृढ होईल, असा सरकारचा विश्वास आहे.

‘वंदे मातरम्’ची रचना बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांनी १८७५ साली केली होती आणि ती १८८२ मध्ये ‘आनंदमठ’ या कादंबरीत प्रकाशित झाली. या गीतात एकूण सहा कडवी असून, प्रारंभी भारतमातेचे नैसर्गिक सौंदर्य आणि मातृरूपाचे वर्णन आहे, तर पुढील कडव्यांत दुर्गा, लक्ष्मी (कमला) आणि सरस्वती या देवतांचा उल्लेख आहे. १९३७ मध्ये काँग्रेसच्या फैजपूर अधिवेशनात काही धार्मिक आक्षेपांमुळे केवळ पहिली दोन कडवी स्वीकारण्यात आली होती. मात्र, आता केंद्र सरकारने राष्ट्रगीताची मूळ ताकद आणि ऐतिहासिक महत्त्व अधोरेखित करण्यासाठी सर्व सहा कडव्यांचे वादन अनिवार्य करण्याचा निर्णय घेतला आहे.

सरकारच्या मते, या निर्णयामागील मुख्य उद्देश म्हणजे राष्ट्रगीताच्या सादरीकरणात एकरूपता, शिस्त आणि सन्मान राखणे. अधिकृत कार्यक्रमांमध्ये ठरावीक कालमर्यादा, ठरलेली आवृत्ती आणि ठरावीक प्रसंगांवरच ‘वंदे मातरम्’चे वादन किंवा गायन केले जाईल, यामुळे कोणताही संभ्रम राहणार नाही.

स्वातंत्र्य संग्रामात देशभक्तीची ज्योत पेटवणाऱ्या ‘वंदे मातरम्’ला त्याच्या संपूर्ण स्वरूपात पुन्हा सन्मान देण्याचा हा निर्णय ऐतिहासिक मानला जात असून, तो राष्ट्रीय अस्मितेच्या दृष्टीने महत्त्वाचा ठरणार आहे.


Protected Content

Play sound