यावल-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । यावल कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून आकारण्यात येणाऱ्या वाढीव मार्केट फीचा त्रास आणि व्यापाऱ्यांवर दाखल करण्यात आलेल्या पोलीस गुन्ह्यांच्या पार्श्वभूमीवर यावल तालुक्यातील व्यापाऱ्यांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे. मागण्या मान्य न झाल्यास धान्य खरेदी पूर्णपणे बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आल्याने बाजारपेठेत खळबळ उडाली आहे.
स्थानिक यावल कृषी बाजार समितीकडून आकारण्यात येणारी मार्केट फी तसेच अवाजवी वाहन शुल्क यामुळे व्यापारी वर्ग अडचणीत सापडला आहे. याचदरम्यान ज्ञानेश्वर बाळू तेली व इतर काही व्यापाऱ्यांवर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घेण्यात यावेत, अशी ठाम मागणी व्यापाऱ्यांकडून होत आहे. या दोन्ही मुद्द्यांवर तोडगा न निघाल्यास व्यापारी आक्रमक पवित्रा घेणार असल्याचे स्पष्ट संकेत देण्यात आले आहेत.

यावल तालुका व्यापारी असोसिएशनच्या वतीने सर्व व्यापारी बांधवांना याबाबत सूचना देण्यात आल्या असून, एकत्रितपणे धान्य खरेदी बंद आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती संघटनेकडून देण्यात आली आहे. व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे की, मार्केट फी आणि वाहन शुल्क हे सध्याच्या परिस्थितीत अवाजवी असून ते तात्काळ कमी करण्यात यावे. तसेच व्यापाऱ्यांवर दाखल केलेले पोलीस गुन्हे मागे न घेतल्यास आंदोलन अधिक तीव्र केले जाईल.
व्यापारी असोसिएशनने आपल्या भूमिकेबाबत स्पष्ट भूमिका मांडली असून, जोपर्यंत मार्केट फी आणि वाहन शुल्कात कपात केली जात नाही, तोपर्यंत धान्य खरेदी बंदच राहणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. शिवाय, या निर्णयाचे उल्लंघन करून कोणीही व्यापारी धान्य खरेदी करताना आढळून आल्यास, संबंधित व्यापाऱ्याकडून व्यापारी असोसिएशन समितीकडे एक लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात येईल, असा कठोर निर्णयही जाहीर करण्यात आला आहे.
या आंदोलनात्मक निर्णयाचा थेट फटका शेतकरी आणि बाजारातील व्यवहारांवर बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. धान्य खरेदी ठप्प झाल्यास शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होण्याची भीती असून, बाजार समितीतील व्यवहारांवरही त्याचा परिणाम होणार आहे. त्यामुळे संबंधित प्रशासनाने या संपूर्ण प्रकरणाकडे गांभीर्याने लक्ष देऊन तात्काळ मध्यस्थी करत तोडगा काढावा, अशी जोरदार मागणी व्यापारी वर्गातून केली जात आहे.



