Home Uncategorized वरणगावात भक्तिमय वातावरणात संगीतमय हनुमान चालीसा पठण उपक्रमाची वर्षपूर्ती

वरणगावात भक्तिमय वातावरणात संगीतमय हनुमान चालीसा पठण उपक्रमाची वर्षपूर्ती


वरणगाव ता. भुसावळ -लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । सनातन धर्माची मूल्ये रुजवण्यासाठी आणि जनमानसात अध्यात्मिक ऊर्जा निर्माण करण्यासाठी वरणगाव येथील वासुदेव परिवाराच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या संगीतमय सामूहिक हनुमान चालीसा पठण उपक्रमाने यशाचे एक वर्ष पूर्ण केले आहे. येत्या शनिवारी, १४ तारखेला या उपक्रमाची वर्षपूर्ती अत्यंत श्रद्धा आणि भक्तिभावाच्या वातावरणात साजरी करण्यात येणार आहे. गेल्या वर्षभरात हा उपक्रम परिसरातील भाविकांसाठी एक मोठा आध्यात्मिक आधारस्तंभ ठरला असून, या काळात तब्बल २,८५० संगीतमय पाठांचा टप्पा यशस्वीपणे पार पडला आहे.

ऊँ सिद्धगुरु नित्यानंद प्रतिष्ठान संचलित ‘रेवा कुटी’ अध्यात्मिक केंद्रात दर महिन्याच्या दुसऱ्या शनिवारी सकाळी ७ ते ९ या वेळेत हे सामूहिक पठण आयोजित केले जाते. डॉ. नितु पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली ८ फेब्रुवारी २०२५ रोजी या उपक्रमाची मुहूर्तमेढ रोवण्यात आली होती. अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने होणाऱ्या या कार्यक्रमात पंचमुखी हनुमानाचे पूजन, सामूहिक रामस्तुती आणि त्यानंतर ११ वेळा सामूहिक हनुमान चालीसा पठण केले जाते. आरती आणि महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता होते. विशेषतः हनुमान जन्मोत्सवाच्या निमित्ताने येथे विशेष हवन आणि ‘राम सेतू शिळेचे’ दर्शन घडविले जाते, जे भाविकांसाठी आकर्षणाचे केंद्र असते.

हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी दीपक फेंगडे, कमलेश येवले, विवेक पाटील, अनिकेत चव्हाण, योगेश मगरे, गोलू तडवी, उमेश माळी, मनोज गोसावी यांच्यासह अनेक कार्यकर्ते अहोरात्र परिश्रम घेत आहेत. वासुदेव परिवाराने केवळ वर्षपूर्तीवर न थांबता, भविष्यात १ लाख संगीतमय हनुमान चालीसा पठण पूर्ण करण्याचा संकल्प सोडला असल्याचे कमलेश येवले यांनी सांगितले. या उपक्रमाच्या माध्यमातून परिसरातील नागरिकांमध्ये जनजागृती आणि अध्यात्मिक सहभाग वाढविण्याचा निर्धार संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.


Protected Content

Play sound