
सावदा-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । शैक्षणिक, सांस्कृतिक व क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा गौरव करण्यासाठी सावदा येथील श्री आ. गं. हायस्कूल व श्री. ना. गो. पाटील कनिष्ठ महाविद्यालयात गुरुवारी, दिनांक ५ फेब्रुवारी २०२६ रोजी वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ उत्साहात पार पडला. विद्यार्थ्यांच्या यशाचा सन्मान आणि त्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना देणारा हा सोहळा उपस्थित मान्यवर, पालक व विद्यार्थ्यांच्या साक्षीने अत्यंत प्रेरणादायी वातावरणात संपन्न झाला.

या समारंभाच्या अध्यक्षस्थानी सावदा नगरपालिकेच्या नगराध्यक्षा मा. सौ. रेणुका राजेंद्र पाटील होत्या. पारितोषिक वितरण समारंभाचे उद्घाटन शिक्षण समितीचे सभापती सचिन चुडामण बऱ्हाटे यांच्या हस्ते करण्यात आले, तर पारितोषिक वितरणाचा मान सावदा पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक विशाल पाटील यांना लाभला. प्रमुख पाहुणे म्हणून उपनगराध्यक्ष फिरोज खाँ हबीबुल्ला खाँ पठाण, माजी नगराध्यक्ष व विद्यमान नगरसेवक राजेंद्र राजेश वानखेडे, सौ. रेखा राजेश वानखेडे, गटनेत्या सौ. रंजना जितेंद्र भारंबे यांच्यासह अनेक नगरसेवक, मान्यवर व पालक शिक्षक संघाचे पदाधिकारी उपस्थित होते.
पाहुण्यांच्या आगमनानंतर दीपप्रज्वलन व सरस्वती पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. प्राचार्य श्री. पी. जी. भालेराव, पर्यवेक्षक श्री. संजय मोतीराम महाजन, उपशिक्षिका कल्पना एम. शिरसाट व संध्या पुरुषोत्तम चौधरी यांनी सर्व पाहुण्यांचे संविधान पुस्तक व पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले तसेच नवनिर्वाचित नगरसेवक व नगरसेविकांचा सत्कार करण्यात आला.
यानंतर प्राचार्य पी. जी. भालेराव यांनी प्रास्ताविक केले, तर शालेय वार्षिक अहवालाचे वाचन संजय मोतीराम महाजन यांनी केले. उपस्थित मान्यवरांनी आपल्या मनोगतातून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत शिक्षण, शिस्त व समाजोपयोगी विचारांचे महत्त्व अधोरेखित केले. यावेळी तरुण उद्योजक मनोज वसंतराव पाटील, सौ. प्रतीक्षा मनीष भंगाळे, कु. सिमरन राजेश वानखेडे तसेच पारितोषिक वितरक विशाल पाटील यांनी प्रेरणादायी विचार मांडले.
पारितोषिक वितरणाच्या टप्प्यात इयत्ता दहावीमध्ये प्रथम आलेल्या तनेश अशोक चौधरी याने सर्वाधिक पारितोषिक पटकावली, तर इयत्ता बारावीमध्ये प्रथम क्रमांक मिळवलेल्या अनुष्का रमाकांत कोष्टी हिलाही विविध पारितोषिकांनी सन्मानित करण्यात आले. वर्षभरात निबंध, वक्तृत्व, रांगोळी, हस्ताक्षर, क्रीडा व इतर विविध स्पर्धांमध्ये यश संपादन करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना यावेळी गौरविण्यात आले.
यानंतर दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ पार पडला. या भावनिक प्रसंगी विद्यार्थ्यांनी शिक्षकांप्रती व शाळेप्रती कृतज्ञता व्यक्त करताना अनेकांच्या डोळ्यांत अश्रू तरळले. शिक्षकांनीही मार्गदर्शनपर व शुभेच्छापर भाषणे देत विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भवितव्याची कामना केली. अध्यक्षीय मनोगतात प्राचार्य पी. जी. भालेराव यांनी विद्यार्थ्यांच्या प्रगतीबद्दल समाधान व्यक्त केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, रुद्र व एनसीसी ग्रुपच्या कॅडेट्स यांनी मोलाचे योगदान दिले. समारोपप्रसंगी प्राचार्यांनी दानशूर दाते व सर्व मान्यवर नगरसेवकांचे आभार मानले. आभार प्रदर्शन श्रीमती प्रणाली काटे यांनी केले, तर सूत्रसंचालन कलाध्यापक नंदकिशोर पाटील यांनी केले.



