
मुंबई-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज वृत्तसेवा । अजित पवार यांच्या आकस्मिक निधनानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात निर्माण झालेल्या पोकळीमुळे सत्ताकारण वेगाने हालचालीत आले आहे. या पार्श्वभूमीवर अजित पवारांच्या जागी सुनेत्रा पवार यांची उपमुख्यमंत्री म्हणून नियुक्ती झाल्यानंतर विरोधकांकडून आणि काही सामाजिक कार्यकर्त्यांकडून घटनात्मक वैधतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले होते. मात्र राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी हे सर्व आरोप ठामपणे फेटाळून लावले आहेत.

सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी सुनेत्रा पवार यांच्या नियुक्तीवर आक्षेप घेतला होता. सुनेत्रा पवार या राज्यसभेच्या खासदार असल्याने, त्यांचा राजीनामा राष्ट्रपतींनी स्वीकारल्याशिवाय त्यांना मंत्रिपदाची शपथ घेता येत नाही, तसेच थेट उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणे घटनात्मकदृष्ट्या चुकीचे असल्याचा दावा त्यांनी केला होता. या वक्तव्यामुळे राज्यातील राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले होते.
या सर्व दाव्यांना उत्तर देताना सुनील तटकरे यांनी स्पष्ट शब्दांत भूमिका मांडली. “आम्हाला राजकीय आणि घटनात्मक तांत्रिक बाबींचे पूर्ण भान आहे. १९९१ मध्ये शरद पवार आणि स्वतः अजित पवार यांची उदाहरणे आपल्या समोर आहेत. सदस्य नसतानाही कोणतीही व्यक्ती सहा महिन्यांपर्यंत मंत्री किंवा महत्त्वाच्या पदावर राहू शकते. त्यामुळे सुनेत्रा पवार यांचे उपमुख्यमंत्रीपद कोणत्याही प्रकारे धोक्यात नाही,” असे तटकरे म्हणाले.
अजित पवार यांचे जानेवारी २०२६ मध्ये विमान अपघातात निधन झाल्यानंतर अवघ्या काही दिवसांतच सुनेत्रा पवार यांनी शपथ घेतल्यानेही राजकीय टीका सुरू झाली होती. यावर स्पष्टीकरण देताना तटकरे म्हणाले की, शपथविधी तातडीने पार पडलेला नसून, तब्बल ७२ तासांनंतर आणि सर्व शासकीय सोपस्कार पूर्ण करूनच हा कार्यक्रम झाला आहे. भावनिक वातावरणाचा गैरफायदा घेतल्याचा आरोप त्यांनी फेटाळून लावला.
याचबरोबर, अंत्यसंस्कार होण्यापूर्वीच काही माध्यमांना दिलेल्या मुलाखती आणि विलीनीकरणाच्या चर्चांबाबतही तटकरे यांनी प्रश्न उपस्थित केला. “या काळात अशा चर्चा पसरवण्यामागे नेमका उद्देश काय होता, याचा विचार होणे गरजेचे आहे,” असे म्हणत त्यांनी अप्रत्यक्षपणे विरोधकांवर निशाणा साधला.



