
धाराशिव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज वृत्तसेवा । उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या धाराशिव जिल्ह्यातील सभेला शिवसेनेतील ज्येष्ठ नेते व माजी मंत्री आमदार तानाजी सावंत यांनी दांडी मारल्याने जिल्ह्यात राजकीय चर्चांना उधाण आले आहे. जिल्हाभरातील प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची उपस्थिती असताना तानाजी सावंत यांची अनुपस्थिती ठळकपणे जाणवली असून, शिवसेनेत सर्वकाही आलबेल नसल्याचे संकेत पुन्हा एकदा समोर आले आहेत.

मंत्रिमंडळ विस्तारात डावलल्यापासून आमदार तानाजी सावंत हे पक्षाच्या अनेक कार्यक्रमांपासून दूर असल्याचे चित्र आहे. विधानसभा निवडणुकीनंतर ते प्रामुख्याने आपल्या मतदारसंघापुरतेच मर्यादित राहिल्याचे दिसून येते. जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारसंघाबाहेर विजय संकल्प मेळावा घेण्यात आला होता, मात्र त्यानंतर त्यांच्या राजकीय हालचाली मर्यादित झाल्याची चर्चा आहे.
भूम, परंडा आणि वाशी तालुक्यांतील जिल्हा परिषद निवडणूक प्रचारात तानाजी सावंत सक्रिय दिसत असले तरी, नगरपरिषदेनंतर आता जिल्हा परिषद निवडणुकीतही त्यांच्या मतदारसंघात मित्र पक्षांसोबत युती नसल्याचे स्पष्ट होत आहे. पक्षाच्या अधिकृत कार्यक्रमांना वारंवार गैरहजर राहिल्याने तानाजी सावंत यांच्या मनात नेमके काय चालले आहे, याबाबत राजकीय वर्तुळात तर्कवितर्क लढवले जात आहेत.
दरम्यान, धाराशिव जिल्ह्यातील पारा जिल्हा परिषद गटातील सभेत तानाजी सावंत यांनी केलेले वक्तव्यही चांगलेच चर्चेत आले आहे. बंडखोर उमेदवारावर थेट निशाणा साधत त्यांनी, “थांब, तुझ्यावर एन्क्वायरी लावतो,” असा इशारा भरसभेत दिला. सभा स्थळी येताना रस्त्यांच्या दुरवस्थेवरून त्यांनी तीव्र संताप व्यक्त करत जनतेला वेठीस धरू नका, असा इशाराही दिला.
रस्त्यांच्या कामावरून विरोधकांवर टीका करताना तानाजी सावंत यांनी आक्रमक शब्दांत भूमिका मांडली. “आज रस्त्यांची काय अवस्था करून ठेवली आहे. मी रस्त्यावरून आलो. तो रस्ता विरोधक आपणच केल्याचा दावा करत आहेत. तुझ्या बापानं निधी आणला का? महाराष्ट्र सरकारचा पैसा आहे, निधी मी आणला. थांब आता तुझी चौकशीच लावतो. माझा नाद करायचा नाही. मी मी म्हणणाऱ्यांची मी जिरवली आहे,” असा इशारा त्यांनी दिला.
एकीकडे पक्षाच्या वरिष्ठ नेत्याच्या सभेला अनुपस्थिती आणि दुसरीकडे सभांमध्ये आक्रमक भूमिका, यामुळे धाराशिव जिल्ह्यातील शिवसेनेतील अंतर्गत नाराजी उघडपणे समोर येत असल्याचे चित्र आहे. आगामी जिल्हा परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या घडामोडी राजकीय समीकरणांवर काय परिणाम करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.



