Home Cities जळगाव जिल्हा परिषद निवडणुकांसाठी जिल्ह्यातून 1884 होमगार्ड रवाना 

जिल्हा परिषद निवडणुकांसाठी जिल्ह्यातून 1884 होमगार्ड रवाना 


जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये जिल्हा परिषद निवडणुकांचे बिगुल वाजले असून, ही प्रक्रिया अत्यंत शांततेत आणि निर्भय वातावरणात पार पडावी यासाठी जळगाव जिल्हा पोलीस प्रशासन आणि होमगार्ड विभागाने कंबर कसली आहे. जळगाव जिल्ह्यातील एकूण १८८४ होमगार्ड जवान बुधवारी ४ जानेवारी रोजी सकाळी १० वाजता छत्रपती संभाजीनगर, सातारा आणि सिल्लोडसह इतर जिल्ह्यांमध्ये बंदोबस्तासाठी रवाना झाले आहेत.

परेड मैदानावरून १३ बसेसचा ताफा प्रस्थान :
आज सकाळी पोलीस अधीक्षक कार्यालयातील परेड मैदानावर सर्व जवानांचे एकत्रीकरण करण्यात आले होते. या ठिकाणाहून एकूण १३ बसेसमधून हा बंदोबस्त मोठ्या उत्साहात रवाना करण्यात आला. निवडणूक काळात मतदानाचे केंद्र, मतमोजणी प्रक्रिया आणि संवेदनशील भागांमध्ये कोणत्याही प्रकारचा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी पोलिसांच्या खांद्याला खांदा लावून हे होमगार्ड आपली सेवा बजावणार आहेत.

जळगाव जिल्ह्यातून इतक्या मोठ्या प्रमाणावर मनुष्यबळ पुरवण्यात आल्याने शेजारील जिल्ह्यांमधील निवडणूक यंत्रणेला मोठा दिलासा मिळाला आहे. पोलीस अधीक्षक कार्यालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी जवानांना बंदोबस्ताच्या नियमावलीबाबत मार्गदर्शन केले आणि कर्तव्य बजावताना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या. या मोहिमेमुळे आगामी निवडणुका निष्पक्ष आणि सुरक्षित पद्धतीने पार पडतील, असा विश्वास प्रशासनाने व्यक्त केला आहे.


Protected Content

Play sound