Home करियर फैजपूरात पत्रकार संघातर्फ़े सत्कार सोहळ्याचे आयोजन ; मान्यवरांचा होणार सन्मान

फैजपूरात पत्रकार संघातर्फ़े सत्कार सोहळ्याचे आयोजन ; मान्यवरांचा होणार सन्मान


फैजपूर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । फैजपूर शहरात समाजकारण, शिक्षण, उद्योग, वैद्यकीय सेवा, क्रीडा आणि कामगार क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या मान्यवरांचा सन्मान करण्यासाठी वार्ता फाऊंडेशन संचालित फैजपूर शहर पत्रकार संघाच्या वतीने भव्य सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे. हा गौरवसोहळा शनिवार, दिनांक ७ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी १०.३० वाजता बसस्थानकासमोरील शुभदिव्य लॉन्स व मंगल कार्यालय, यावल रोड, फैजपूर येथे मोठ्या उत्साहात संपन्न होणार आहे.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी फैजपूर येथील सतपंथ मंदिर संस्थानचे गादीपती महामंडलेश्वर जनार्दन हरीजी महाराज विराजमान राहणार आहेत. उद्घाटन रावेर-यावल विधानसभेचे आमदार श्री. अमोलदादा जावळे आणि माजी आमदार श्री. शिरीषदादा चौधरी यांच्या शुभहस्ते होणार असून, कार्यक्रमाला सामाजिक, राजकीय आणि प्रशासकीय क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती लाभणार आहे.

सत्कार समारंभात फैजपूर शहरातील विविध क्षेत्रांतील कर्तृत्ववान व्यक्तींना ‘रत्न’ पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे. समाजभूषण, शिक्षण सारथी, विद्याभूषण, उद्योगरत्न, राजतेजस्विनी, सेवाव्रती, धरतीपुत्र, श्रमिक कामगार, क्रीडा क्षेत्र आणि प्रेरणा मूर्ती अशा विविध सन्मानांनी मान्यवरांचा गौरव केला जाणार आहे. यासोबतच फैजपूर नगरपालिकेच्या नवनिर्वाचित नगरसेवक व नगरसेविकांचाही विशेष सत्कार करण्यात येणार असल्याने कार्यक्रमाचे महत्त्व अधिक वाढले आहे.

या भव्य सोहळ्यास प्रमुख अतिथी म्हणून फैजपूर नगराध्यक्षा सौ. दामिनी पवन सराफ, यावल नगराध्यक्षा सौ. छाया अतुल पाटील, मुख्याधिकारी अविनाश गांगोडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत. शहराच्या सामाजिक आणि सार्वजनिक जीवनात योगदान देणाऱ्या घटकांना एकत्र आणणारा हा कार्यक्रम प्रेरणादायी ठरणार असल्याचे आयोजकांचे मत आहे.

या कार्यक्रमाला शहरवासीयांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून सत्कारप्राप्त मान्यवरांना शुभेच्छा द्याव्यात, असे आवाहन वार्ता फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष योगेश सोनवणे, पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रा. राजेंद्र तायडे, उपाध्यक्ष राजू तडवी, सचिव शाकीर मलिक, खजिनदार प्रा. उमाकांत पाटील, प्रसिद्धी प्रमुख मयूर मेढे, सहसचिव सलीम पिंजारी तसेच जेष्ठ पत्रकार वासुदेव सरोदे, अरुण होले, इदू पिंजारी, संजय सराफ आणि सर्व सदस्यांच्या वतीने करण्यात आले आहे. कार्यक्रमानंतर उपस्थितांसाठी स्नेहभोजनाचीही व्यवस्था करण्यात आली आहे.


Protected Content

Play sound