
भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भुसावळ शहरातील एका २७ वर्षीय तरुणीची १० लाख रूपयांची आर्थिक फसवणूक केली आणि लग्नासाठी दबाव टाकून तिचा विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याबाबत एका तरुणाविरुद्ध भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, भुसावळ शहरातील एका भागात २७ वर्षीय तरूणी ही आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. दरम्यान संशयित अरोपी सिद्धांक मनोज हेडा (रा. गंगाराम प्लॉट, भुसावळ) याने सन २०२० मध्ये या तरूणीची ओळख निर्माण केली. त्यानंतर त्याने पिडीत तरूणीची ओळखीचा फायदा घेऊन तिला शेअर मार्केटमध्ये फायदा करून देण्याचे आमिष दाखवले. त्याने तिच्या डी-मॅट अकाउंटची माहिती घेऊन आणि क्रेडिट कार्ड वापरून सुमारे १० लाख रुपयांची फसवणूक केली. इतकेच नव्हे तर, त्याने लग्नासाठी दबाव टाकून तिचा मुंबई ते मंगलोरपर्यंत पाठलाग केला. फिर्यादीच्या घरात घुसून तिला चाकूचा धाक दाखवत तिचा विनयभंग केला आणि तिचे वैयक्तिक फोटो मॉर्फ करून इंटरनेटवर अपलोड करण्याची धमकी दिली. या त्रासाला कंटाळून तरुणीने तक्रार दिली त्यानुसार भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक राहुल वाघ अधिक तपास करत आहेत



