Home Cities जळगाव लोकशाही दिनात विविध विभागांचे ५१ तक्रार अर्ज प्राप्त

लोकशाही दिनात विविध विभागांचे ५१ तक्रार अर्ज प्राप्त


जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । सामान्य नागरिकांच्या समस्या थेट प्रशासनापर्यंत पोहोचाव्यात आणि त्यावर तात्काळ कार्यवाही व्हावी, या उद्देशाने जिल्हाधिकारी कार्यालयातील अल्पबचत भवन येथे आज लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात आले. या लोकशाही दिनात विविध विभागांशी संबंधित तक्रारी घेऊन नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

लोकशाही दिनाच्या अध्यक्षस्थानी अप्पर जिल्हाधिकारी श्रीमंत हारकर होते. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी वैशाली चव्हाण, तहसीलदार उमा ढेकळे, जिल्हा परिषदेचे भाऊसाहेब अकलाडे तसेच जिल्हा कृषी अधीक्षक कुर्बान तडवी यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीमुळे नागरिकांना आपली कैफियत थेट मांडण्याची संधी मिळाली.

आजच्या लोकशाही दिनात विविध विभागांशी संबंधित एकूण ५१ तक्रार अर्ज प्राप्त झाले. यामध्ये महसूल, कृषी, ग्रामविकास, पाणीपुरवठा, सामाजिक कल्याण, शिक्षण तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांशी निगडित तक्रारींचा समावेश होता. नागरिकांनी वैयक्तिक तसेच सार्वजनिक स्वरूपाच्या समस्या मांडल्या.

प्राप्त झालेल्या तक्रारींबाबत संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांना तातडीने चौकशी करून नियमानुसार कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात आल्या. काही प्रकरणांवर जागेवरच मार्गदर्शन करण्यात आले, तर उर्वरित तक्रारींच्या निराकरणासाठी निश्चित कालमर्यादा ठरवून त्याचा अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले.

लोकशाही दिनामुळे नागरिक आणि प्रशासन यांच्यात थेट संवाद साधला जात असून, समस्या मांडण्यासाठी एक प्रभावी व्यासपीठ उपलब्ध होत असल्याची भावना उपस्थित नागरिकांनी व्यक्त केली. प्रशासनाकडूनही तक्रारींचे गांभीर्याने दखल घेतली जात असल्याने लोकशाही दिन उपक्रम उपयुक्त ठरत असल्याचे चित्र दिसून आले.


Protected Content

Play sound