मुक्ताईनगर – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव तालुक्यातील हिंगणा वैजनाथ येथील श्री नवनाथ महाराज मंदिरात महाराजांच्या मूर्तींची विटंबना झाल्याच्या घटनेने नाथजोगी समाजात तीव्र संताप व्यक्त केला जात असून, या पार्श्वभूमीवर मुक्ताईनगर येथे नाथजोगी समाजातर्फे जाहीर निषेध नोंदवण्यात आला. समाजबांधवांनी संबंधित दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी ठाम मागणी करत लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाला निवेदन दिले.
मुक्ताईनगर येथे झालेल्या या निषेध आंदोलनावेळी विधानसभा मतदारसंघाचे आमदार चंद्रकांत पाटील, भुसावळचे प्रांत अधिकारी जितेंद्र पाटील तसेच तहसीलदार गिरीश वखारे यांना निवेदन सादर करण्यात आले. निवेदनामध्ये हिंगणा वैजनाथ येथील घटनेचा तीव्र शब्दांत निषेध करत, नाथ संप्रदायाच्या धार्मिक भावना दुखावणाऱ्या समाजकंटकांवर तातडीने कारवाई करण्याची मागणी करण्यात आली.

नाथ संप्रदायाची गुरु-शिष्य परंपरा ही अत्यंत पवित्र असून श्री नवनाथ महाराज हे नाथजोगी समाजाचे आराध्य दैवत आहेत. त्यांच्या मूर्तींची विटंबना ही केवळ एका समाजावर नव्हे तर संपूर्ण धार्मिक परंपरेवर आघात असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले. अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी दोषींना कठोर शिक्षा देण्याची आवश्यकता असल्याचे समाजबांधवांनी नमूद केले.
निवेदन देताना मुक्ताईनगर नाथजोगी नवतरुण मंडळाचे अध्यक्ष मोतीलाल जोगी, अखिल भारतीय नाथजोगी समाज संघटना जळगाव जिल्हा संघटक संदीप जोगी, ज्येष्ठ रमेशनाथ जोगी, किशोर जोगी, सुरेश जोगी, नामदेव जोगी, सचिन जोगी, दत्ता जोगी, अनिल जोगी, रितेश जोगी, आकाश जोगी यांच्यासह समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रशासनाने या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन सखोल चौकशी करावी व संबंधित समाजकंटकांवर कायदेशीर कारवाई करावी, अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली. नाथजोगी समाजाने शांततेच्या मार्गाने आपला निषेध नोंदवला असला, तरी न्याय न मिळाल्यास पुढील आंदोलनात्मक भूमिका घेण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला.



