Home Cities अमळनेर पाडळसरे येथे उद्या मरीआई यात्रोत्सव ; लोकनाट्य तमाशा मंडळाचे आयोजन

पाडळसरे येथे उद्या मरीआई यात्रोत्सव ; लोकनाट्य तमाशा मंडळाचे आयोजन

0
183

अमळनेर – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । अमळनेर तालुक्यातील कळमसरे गावाजवळ असलेल्या पाडळसरे येथे उद्या सोमवार (दि. ३ फेब्रुवारी) रोजी सालाबादप्रमाणे मरीआई देवीचा यात्रोत्सव पारंपरिक श्रद्धा आणि उत्साहात साजरा होणार आहे. अनेक वर्षांची परंपरा लाभलेल्या या यात्रेसाठी परिसरातील भाविकांमध्ये मोठे चैतन्य दिसून येत आहे.

पाडळसरे येथील मरीआईची यात्रा ही गावाच्या धार्मिक व सांस्कृतिक जीवनाचा अविभाज्य भाग मानली जाते. या यात्रेची सुरुवात माजी उपसरपंच भिला साळुंखे यांनी गावातील ग्रामस्थांच्या सहकार्याने केली होती. कालांतराने गावाचे नवीन पुनर्वसन झाले असले तरी तापी नदीकाठावर वसलेले नाटेश्वर महादेव मंदिर आणि मरीआई मातेचे मंदिर जुन्याच गावात असल्याने आजही यात्रोत्सव याच ठिकाणी पारंपरिक पद्धतीने भरविला जातो, हे या यात्रेचे वैशिष्ट्य आहे.

इडा-पीडा दूर करणारी देवी म्हणून मरीआई मातेवर गावकऱ्यांची अपार श्रद्धा आहे. यात्रोत्सवाच्या दिवशी महिला, पुरुष, वृद्ध व बालक मोठ्या भक्तिभावाने देवीचे दर्शन घेतात. नवस फेडणे, पूजाअर्चा आणि देवीच्या जयघोषाने संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणात न्हाऊन निघतो.

यात्रोत्सवाच्या निमित्ताने लोकमनोरंजनासाठी प्रसिद्ध शांताराम चव्हाण दहिवदकर यांचा लोकनाट्य तमाशा मंडळाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. तमाशाच्या फडामुळे यात्रेतील रात्र रंगतदार होणार असून परिसरातील रसिक प्रेक्षक मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याची शक्यता आहे.

दरम्यान, यात्रोत्सव काळात हॉटेल व्यावसायिक, झुले-पाळणे चालक, खेळणी विक्रेते तसेच संसारोपयोगी साहित्य विक्रेत्यांनी आपली दुकाने थाटावीत, असे आवाहन पाडळसरे ग्रामपंचायतीच्या वतीने करण्यात आले आहे. तसेच यात्रेदरम्यान शांतता, सुव्यवस्था आणि कायदा-सुव्यवस्था राखण्याचे आवाहनही ग्रामपंचायतीने नागरिकांना केले आहे.


Protected Content

Play sound