जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । नाशिक येथे भाजप नगरसेवकांच्या गट नोंदणीची प्रक्रिया पूर्ण करून परत येत असताना, जळगावच्या माजी महापौर तथा नवनिर्वाचित नगरसेविका जयश्री महाजन आणि त्यांचे पती नगरसेवक सुनील महाजन यांच्या कारला मालेगावजवळ भीषण अपघात झाला. बुधवारी २१ जानेवारी रोजी ७:४५ वाजेच्या सुमारास ही घटना घडली असून, सुदैवाने या भीषण धडकेतून महाजन दाम्पत्यासह कारमधील चौघे जण बालंबाल बचावले आहेत.
जळगाव महानगरपालिकेतील भाजपचे नवनिर्वाचित ४६ नगरसेवक गट नोंदणीसाठी नाशिक येथील विभागीय आयुक्त कार्यालयात गेले होते. ही प्रक्रिया आटोपून जयश्री महाजन आणि सुनील महाजन हे (एम.एच. ५२ बी ०९९९) या कारने जळगावकडे परतत होते. मालेगाव जवळील हॉटेल सुखधामजवळ महामार्गावर समोरील वाहनाने गतिरोधकामुळे अचानक ब्रेक दाबला. यामुळे मागून भरधाव वेगाने येणारी महाजन दाम्पत्याचे वाहन समोरील वाहनावर जोरात आदळली गेली.

या अपघातात कारच्या दर्शनी भागाचा अक्षरशः चुराडा झाला. मात्र, अपघाताच्या वेळी कारमधील माजी महापौर जयश्री महाजन, नगरसेवक सुनील महाजन, विनोद मराठे आणि स्वीय सहाय्यक ललित धांडे या चौघांनीही सीट बेल्ट लावले असल्याने त्यांना गंभीर दुखापत झाली नाही. एअरबॅग्स आणि चालकाच्या प्रसंगावधानामुळे मोठी जीवितहानी टळली आहे.



