पाचोरा-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । पाचोरा शहरात मोबाईल चोरीच्या घटनेत पाचोरा पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने अत्यंत तत्परतेने कारवाई करत अवघ्या १२ तासांत आरोपीस जेरबंद केले असून, चोरीस गेलेले मोबाईल हस्तगत करून न्यायालयात दोषारोपपत्रही दाखल केले आहे. या जलद कारवाईमुळे पाचोरा पोलिसांच्या कार्यक्षमतेचे पुन्हा एकदा दर्शन घडले आहे.
दिनांक १८ जानेवारी २०२६ रोजी दुपारी सुमारे ३.२५ वाजण्याच्या सुमारास फिर्यादी किशोर आनंदराव नरेराव (वय ३९ वर्षे, व्यवसाय स्विट व कोल्डड्रिंक्स विक्रेता, रा. कृष्णपुरी, पाचोरा, मूळ रा. निंभोरी, ता. पाचोरा) हे आपल्या चारचाकी वाहनात मोबाईल चार्जिंगसाठी पॉवर बँकला लावलेला मोबाईल ठेवून होते. याच संधीचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने त्यांच्या संमतीशिवाय लबाडीच्या उद्देशाने मोबाईल चोरी करून नेला. या प्रकरणी पाचोरा पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक २१/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता सन २०२३ चे कलम ३०३ (२) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.

गुन्हा दाखल होताच पाचोरा पोलीस स्टेशनच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने तपासाची चक्रे वेगाने फिरवली. पोलीस हवालदार राहुल काशिनाथ शिंपी, अशोक रामचंद्र हटकर, शरद मांगो पाटील आणि संदीप किसन भोई यांनी सीसीटीव्ही फुटेज तसेच तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे संशयिताचा शोध सुरू केला. तपासादरम्यान संशयित इसम फिरताना मिळून आल्याने त्यास ताब्यात घेण्यात आले.
ताब्यात घेतल्यानंतर आरोपीने आपले नाव सौरभ नाना भिल (गायकवाड), वय २५ वर्षे, रा. कळमसरे, ता. पाचोरा, जि. जळगाव असल्याचे सांगितले. पोलीस ठाण्यात प्राथमिक चौकशीदरम्यान त्याने सदर मोबाईल चोरीचा गुन्हा केल्याची कबुली दिली. तसेच पहूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतही अशाच प्रकारे मोबाईल चोरी केल्याचे उघडकीस आले. तपासात आरोपीकडून एकूण ३० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून, त्यामध्ये १५ हजार रुपये किमतीचा फिकट निळ्या रंगाचा शाओमी कंपनीचा अँड्रॉइड मोबाईल आणि ५ हजार रुपये किमतीचा विवो Y27 Pro मोबाईल यांचा समावेश आहे.
पोलिसांनी आरोपीस अटक करून अवघ्या १२ तासांत सदर गुन्ह्याचे दोषारोपपत्र मा. पाचोरा न्यायालयात दाखल केले आहे. आरोपीस पुढील कारवाईसाठी धुळे सबजेल येथे पाठविण्यात आले असून, या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार राहुल काशिनाथ शिंपी करीत आहेत.
ही संपूर्ण कामगिरी पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, अप्पर पोलीस अधीक्षक कविता नेरकर, उपविभागीय पोलीस अधिकारी बापू रोहम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राहुलकुमार पवार तसेच गुन्हे शोध पथकातील अधिकारी व अंमलदारांनी यशस्वीरीत्या पार पाडली आहे.



