
पारोळा-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । पारोळा तालुक्यात अस्तित्वात नसलेल्या भाटपुरी गावाच्या नावाने तब्बल ४,९०७ खोट्या जन्म नोंदी केल्या गेल्या असल्याचे धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. या गंभीर प्रकरणाच्या तपासासाठी जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या निर्देशानुसार एसआयटी स्थापन करण्यात आली आहे. माजी खासदार किरीट सोमय्या आज भाटपुरी येथे भेट देऊन या प्रकरणाची सखोल माहिती घेणार आहेत.

तपासात निष्पन्न झाले आहे की, बिहारमधील आदर्शकुमार उर्फ विक्की अशोक दुबे या तरुणाने भाटपुरी नावाचा १३ बोगस आयडी तयार केला. २०१० ते २०२५ या कालावधीत या आयडीचा वापर करून तब्बल ४,९०७ खोट्या जन्म दाखल्याच्या नोंदी करण्यात आल्या. या प्रकरणी डिसेंबर महिन्यात यवतमाळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर पारोळा पंचायत समितीचे प्रभारी गटविकास अधिकारी संजय मोरे यांच्या फिर्यादीवरून पारोळा पोलीस ठाण्यातही स्वतंत्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
स्थापित एसआयटीमध्ये तपास अधिकारी विनायक कोते (उपविभागीय पोलीस अधिकारी, अमळनेर), सहाय्यक तपास अधिकारी अशोक पवार (पोलीस निरीक्षक, पारोळा), सदस्य सतीष गोराडे (पीआय, सायबर पोलीस स्टेशन), मुस्तफा मिर्झा (पीएसआय, सायबर), शरद पाटील आणि दिलीप चिचोले यांचा समावेश आहे. या पथकाद्वारे प्रकरणाची सखोल चौकशी, खोट्या नोंदींचा तपास आणि संभाव्य आंतरराज्यीय रॅकेटची माहिती गोळा केली जाणार आहे.
भाटपुरी गावाला भेट देणाऱ्या किरीट सोमय्यांनी या प्रकरणाच्या गंभीरतेवर भर देत प्रशासनाला त्वरित योग्य ती कारवाई करण्याची मागणी केली आहे. रताळे येथील भेटीदरम्यान त्यांनी स्थानिक अधिकार्यांशी चर्चा करून तपासाच्या गतीबाबत माहिती घेतली. या दौऱ्यामुळे प्रशासकीय गटात मोठी खळबळ उडाली असून, नागरिक आणि स्थानिक नेत्यांमध्येही प्रकरणाविषयी चर्चा वाढली आहे.



