Home Cities अमळनेर मूकबधिर मुलीवर अत्याचार नराधमाला २० वर्षांची सक्तमजुरीची शिक्षा

मूकबधिर मुलीवर अत्याचार नराधमाला २० वर्षांची सक्तमजुरीची शिक्षा


अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी ।माणुसकीला काळिमा फासणाऱ्या एका गंभीर प्रकरणात अमळनेर येथील न्यायालयाने निकाल दिला आहे. एका १६ वर्षीय मूकबधिर अल्पवयीन मुलीवर वारंवार अत्याचार करून तिला गर्भवती करणाऱ्या नराधम आरोपी दीपक नाना भिल (वय २७) याला २० वर्षे सश्रम कारावास आणि १० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

अशी घडली घटना :
जानेवारी २०२२ मध्ये अमळनेर शहर पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल झाला होता. आरोपी दीपक भिल याने पीडित मुलगी रात्री घराबाहेर खाटेवर झोपलेली असताना तिला घरामागे नेऊन तिच्यावर अत्याचार केला. एवढेच नव्हे, तर शेतात काम करत असतानाही त्याने तिला गाठून वारंवार शारीरिक शोषण केले. या अत्याचारातून पीडित मुलगी साडेपाच महिन्यांची गर्भवती राहिली. मुलीच्या वडिलांच्या तक्रारीवरून पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली होती.

पीडितेची ‘मूक’ साक्ष ठरली निर्णायक :
या खटल्याचे वैशिष्ट्य म्हणजे पीडित मुलगी बोलू किंवा ऐकू शकत नसल्याने, तिची साक्ष नोंदवण्यासाठी विशेष शिक्षकांची (दुभाषी) मदत घेण्यात आली. ‘इन कॅमेरा’ व्हिडिओग्राफीद्वारे आणि खुणांच्या भाषेत पीडितेने घडलेला प्रकार न्यायालयासमोर मांडला. सरकारी वकील ॲड. किशोर आर. बागुल यांनी एकूण ९ साक्षीदार तपासले. यामध्ये वैद्यकीय अधिकारी, पोलीस पाटील आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे आरोपीचा डीएनए (DNA) अहवाल पॉझिटिव्ह आल्याने गुन्हा सिद्ध होण्यास मोठी मदत झाली.

न्यायालयाचा निकाल :
दोन्ही बाजूंचा युक्तिवाद आणि भक्कम पुरावे ग्राह्य धरून, अतिरिक्त सत्र जिल्हा न्यायाधीश एल. डी. गायकवाड यांनी आरोपी दीपक भिल याला पोक्सो कायदा आणि भादंवि कलम ३७६ नुसार दोषी ठरवले. त्याला २० वर्षांची शिक्षा सुनावतानाच, दंडाच्या रकमेतील ७ हजार रुपये पीडितेस देण्याचे आदेशही न्यायालयाने दिले आहेत. पोलीस उपनिरीक्षक नरसिंह वाघ आणि त्यांच्या पथकाने या प्रकरणाचा तपास पूर्ण केला होता.


Protected Content

Play sound