Home प्रशासन नगरपालिका कोंडवाड्यातच रूग्णांवर उपचार करणार का? – युवराज लोणारी 

कोंडवाड्यातच रूग्णांवर उपचार करणार का? – युवराज लोणारी 


भुसावळ-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । भुसावळ नगरपरिषदेतील सत्तांतरानंतर अवघ्या काही दिवसांतच नगरपरिषदेच्या कारभारावरून मोठा वाद निर्माण झाला असून, विद्यमान दप्तर संत गाडगेबाबा रूग्णालयात स्थलांतरित करण्याच्या हालचालींमुळे शहरातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. कोणताही अधिकृत ठराव, निविदा प्रक्रिया किंवा जिल्हाधिकाऱ्यांची पूर्वपरवानगी न घेता हे स्थलांतर करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप करत भारतीय जनता पक्षाचे गटनेते युवराज लोणारी यांनी या निर्णयाला तीव्र विरोध दर्शविला आहे.

नवनिर्वाचित सत्ताधारी नगरसेवकांनी विद्यमान नगरपरिषद इमारतीची अवस्था अत्यंत जर्जर असल्याचे सांगत तिला “कोंडवाडा” असे संबोधले होते. याच वक्तव्याचा आधार घेत युवराज लोणारी यांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केली. जर नगरपरिषद इमारत कोंडवाड्यासारखी असेल, तर त्याच कोंडवाड्यात गोरगरीब रुग्णांना उपचारासाठी दाखल करणार का, असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला. नगरपरिषदेचे दप्तर आणि प्रशासकीय कामकाज थेट रूग्णालयात हलवणे म्हणजे जनतेच्या आरोग्य सेवेशी खेळ करण्यासारखे असल्याचा आरोप त्यांनी केला.

लोणारी यांनी स्पष्ट केले की, सदर स्थलांतर प्रक्रिया कोणतीही नियमबाह्य असून ती थेट कर्मचाऱ्यांच्या मदतीने दप्तर उचलून करण्याचा प्रयत्न आहे. यामुळे महत्त्वाची कागदपत्रे गहाळ होण्याचा धोका निर्माण होऊ शकतो. असे झाल्यास याची संपूर्ण जबाबदारी सत्ताधाऱ्यांवर राहील आणि ही बाब कायद्याच्या चौकटीत येऊ शकते, असा इशाराही त्यांनी दिला.

संत गाडगेबाबा रूग्णालयाची सध्याची परिस्थितीही त्यांनी अधोरेखित केली. या रूग्णालयात सध्या भूलतज्ज्ञ डॉक्टर उपलब्ध नसल्यामुळे महिलांची प्रसूतीसारख्या अत्यंत महत्त्वाच्या सेवा पुरवता येत नाहीत. काही वर्षांपूर्वी शहरातील गोरगरीब जनतेच्या आरोग्य सेवेसाठी गरूड परिवाराने नगरपालिका दवाखान्यासाठी जागा दान केली होती, ही बाब आठवण करून देत लोणारी यांनी सत्ताधारी आणि नगराध्यक्षांच्या जबाबदारीवर बोट ठेवले. आरोग्य सेवा बळकट करण्याऐवजी दप्तर स्थलांतराच्या नावाखाली केवळ दिखाऊ निर्णय घेतले जात असल्याची टीका त्यांनी केली.

या प्रकरणात लोणारी यांनी पर्यायी आणि सकारात्मक भूमिका मांडत नगरपरिषदेच्या नवीन इमारतीसाठी शासनाकडे २५ कोटी रुपयांचा प्रस्ताव पाठवण्याचा सल्ला दिला. नवीन व सुसज्ज नगरपरिषद इमारत उभारण्यासाठी वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्या माध्यमातून आपला कायम पाठिंबा राहील, असे त्यांनी स्पष्ट केले. मात्र, सध्याच्या घाईघाईने सुरू असलेल्या स्थलांतर प्रक्रियेला जिल्हाधिकारी जळगाव यांची लेखी परवानगी आवश्यक असल्याचेही त्यांनी ठामपणे सांगितले.

या संपूर्ण घडामोडींमुळे भुसावळ नगरपरिषदेत सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार शाब्दिक युद्ध सुरू झाले आहे. शहरातील नागरिकांनीही या प्रकरणात पारदर्शकता राखावी व जनतेच्या हिताचा विचार करूनच निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. पुढील काही दिवसांत जिल्हा प्रशासन या स्थलांतरावर काय भूमिका घेते, याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे.

दरम्यान, आज वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्या कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत उपनगराध्यक्षा शैलैजा पुरूषोत्तम नारखेडे, उपगटनेते परीक्षीत बकुळ, नगरसेवक पिंटू कोठारी, राजेंद्र आवटे, प्रकाश बत्रा, विशाल नाटकर, गिरीश महाजन, सुजित भोळे, किरण कोलते तसेच माजी नगरसेवक पुरूषोत्तम नारखेडे उपस्थित होते.


Protected Content

Play sound