मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । राज्य शासनाच्या ऊर्जा धोरणांतर्गत बसवण्यात येत असलेल्या स्मार्ट मीटरमुळे मुक्ताईनगर शहरातील सर्वसामान्य नागरिक आर्थिक अडचणीत सापडले आहेत. थंडीच्या दिवसांत वीज वापर अत्यल्प असतानाही केवळ २५ दिवसांचे तब्बल साडेचार हजार रुपयांचे वीजबिल आल्याने नागरिकांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे. शासनाच्या या निर्णयामुळे दिलासा मिळण्याऐवजी आर्थिक ओझे वाढत असल्याची भावना नागरिक व्यक्त करत आहेत.
राज्य शासन व ऊर्जा विभागाच्या आदेशानुसार महावितरणकडून स्मार्ट मीटर योजना राबवली जात आहे. मात्र ही योजना लागू करताना कोणतीही व्यापक जनजागृती न केल्याने नागरिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. स्मार्ट मीटर बसवल्यानंतर प्रत्यक्ष रीडिंगची गरज भासणार नाही, असे सांगण्यात आले होते. प्रत्यक्षात मात्र महावितरणचे कर्मचारी रीडिंग घेऊन गेल्यानंतरही नागरिकांना सरासरी वापराच्या आधारे अवाजवी वीजबिले पाठवण्यात आली आहेत.

नागरिकांच्या म्हणण्यानुसार, उन्हाळ्यात एसी, कूलर, पंखे यांचा मोठ्या प्रमाणावर वापर होत असतानाही तुलनेने कमी वीजबिले येत होती. मात्र सध्या थंडीच्या दिवसांत वीज वापर अत्यंत मर्यादित असतानाही हजारो रुपयांची बिले येत असल्याने स्मार्ट मीटर योजनेच्या विश्वासार्हतेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. ही योजना नागरिकांच्या फायद्याऐवजी शासनाच्या तिजोरी भरण्यासाठीच असल्याचा आरोप होत आहे.
प्रत्येक युनिटमागे आकारण्यात येणारे दर, बिलाची अचूक गणना आणि स्मार्ट मीटरचे फायदे याबाबत शासन किंवा महावितरणकडून कोणतीही स्पष्ट व पारदर्शक माहिती दिली जात नाही. ऊर्जा विभागातील अधिकाऱ्यांकडे विचारणा केली असता, मागील कालावधीच्या सरासरी वापरावर बिल देण्यात आल्याची उत्तरे दिली जात आहेत. या भूमिकेमुळे शासनाला नागरिकांच्या आर्थिक अडचणींची पर्वा नसल्याचे स्पष्ट होत असल्याची प्रतिक्रिया उमटत आहे.
वीजदरवाढ, स्मार्ट मीटरमुळे वाढलेली बिले आणि त्याचवेळी शासनाच्या धोरणांमुळे सोलर सिस्टिमचे वाढलेले दर यामुळे नागरिकांसमोर कोणताही व्यवहार्य पर्याय उरलेला नाही. वीज ही मूलभूत गरज असताना शासनच नागरिकांच्या खिशावर डल्ला मारत असल्याची भावना मुक्ताईनगरमध्ये तीव्र होत चालली आहे.
या पार्श्वभूमीवर स्मार्ट मीटर योजना तातडीने स्थगित करावी, चुकीची व अवाजवी वीजबिले रद्द करावीत आणि नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी मुक्ताईनगरातील संतप्त नागरिकांकडून होत असून अन्यथा आंदोलनाचा इशाराही देण्यात येत आहे.



