
मुंबई-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज वृत्तसेवा । महाराष्ट्रातील महापालिका निवडणुकांचे निकाल जवळपास स्पष्ट झाले असून राज्याच्या राजकारणात मोठा बदल घडवणारे चित्र समोर आले आहे. भाजप आणि महायुतीने या निवडणुकांत घवघवीत यश मिळवत बहुसंख्य महापालिकांवर सत्ता मिळवली आहे. निकालानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहिली अधिकृत प्रतिक्रिया देत जनतेचे आभार मानले असून, भाजप-महायुतीच्या विजयाचा ठोस आकडाही त्यांनी जाहीर केला आहे.

राज्यातील मुंबई, पुणे, पिंपरी-चिंचवड, नाशिक, छत्रपती संभाजीनगर यांसारख्या मोठ्या महापालिकांमध्ये भाजप आणि महायुतीची स्पष्ट बहुमताकडे वाटचाल सुरू असल्याचे निकालांतून दिसून आले आहे. अनेक ठिकाणी भाजपची सत्ता निश्चित झाली असून विरोधकांना मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांशी संवाद साधत निवडणूक निकालांबाबत समाधान व्यक्त केले.
देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “महाराष्ट्राच्या जनतेचे मी मनापासून आभार मानतो. महापालिका निवडणुकांमध्ये भारतीय जनता पार्टी आणि महायुतीला अभूतपूर्व महाविजय मिळाला आहे. 29 पैकी तब्बल 25 महापालिकांमध्ये भाजप किंवा महायुतीची सत्ता येत आहे. अनेक ठिकाणी आम्ही जुने रेकॉर्ड मोडले असून हा विजय जनतेच्या विश्वासाचे प्रतीक आहे.”
मुंबई महापालिकेबाबत बोलताना त्यांनी स्पष्ट शब्दांत विश्वास व्यक्त केला. सध्या काही ठिकाणी मतमोजणीला उशीर होत असला तरी आतापर्यंतची वाटचाल पाहता मुंबई महापालिकेतही महायुतीला पूर्ण बहुमत मिळेल, अशी ठाम भूमिका त्यांनी मांडली. “मुंबईमध्येही महायुतीचा झेंडा फडकणार आहे, यामध्ये कोणतीही शंका नाही,” असे फडणवीस यांनी सांगितले.
पुढे बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, या निवडणुकांमध्ये भाजप आणि महायुती विकासाचा अजेंडा घेऊन जनतेसमोर गेले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली मांडलेल्या विकासाच्या दृष्टिकोनालाच मतदारांनी पसंती दिली आहे. “विकास, पारदर्शकता आणि प्रामाणिकपणा हाच आमचा मुख्य मुद्दा होता. जनतेला प्रामाणिक काम हवे आहे, हे या निकालातून स्पष्ट झाले आहे,” असे त्यांनी नमूद केले.
मुंबई महापालिकेच्या निकालाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले होते. प्राथमिक निकालांनुसार मुंबईत भाजप-शिवसेना शिंदे गट 122 जागांवर आघाडीवर असून शिवसेना ठाकरे गट आणि मनसे मिळून 72 जागांवर आघाडीवर असल्याचे चित्र आहे. त्यामुळे मुंबईतही भाजप-शिवसेना महायुतीची सत्ता येण्याचे संकेत स्पष्ट झाले आहेत.



