
मुंबई-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज वृत्तसेवा। मुंबई महानगरपालिकेच्या निवडणूक निकालांकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले असताना आज सकाळपासून सुरू झालेल्या मतमोजणीत पहिल्याच तासात राजकीय चित्र वेगाने बदलताना दिसत आहे. एकीकडे भाजप आणि शिवसेना शिंदे गटाने आक्रमक सुरुवात केली असली तरी, दुसरीकडे ठाकरे बंधूंनी एकत्र येत केलेल्या राजकीय प्रयोगाला मतदारांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत असल्याचे संकेत सुरुवातीच्या फेऱ्यांतून मिळू लागले आहेत.

मुंबई महापालिकेच्या २२७ जागांसाठी झालेल्या निवडणुकीत सुमारे ५२.९४ टक्के मतदान झाले होते. निकाल जाहीर होण्याआधीच विविध एक्झिट पोल चर्चेत आले होते. जनमतच्या एक्झिट पोलमध्ये भाजप आणि शिवसेना शिंदे गटाच्या युतीला १३८ जागा मिळतील, असा अंदाज वर्तवण्यात आला होता. त्याचवेळी ठाकरे बंधूंची युती आणि शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस यांना मिळून फक्त ६२ जागांवर समाधान मानावे लागेल, असे भाकीत करण्यात आले होते. काँग्रेस आणि वंचित आघाडीला २०, तर इतर पक्षांना ७ जागा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती.
मात्र प्रत्यक्ष मतमोजणीला सुरुवात होताच या अंदाजांना छेद देणारी स्थिती निर्माण झाली आहे. पहिल्या एका तासातच शिवसेना ठाकरे गट आणि मनसेने अपेक्षेपेक्षा चांगली कामगिरी करत आघाडी घेतली आहे. त्याचवेळी भाजप आणि शिवसेना शिंदे गटानेही आपली ताकद दाखवत अनेक प्रभागांमध्ये आघाडी मिळवली आहे. पहिल्या तासाच्या आकडेवारीनुसार भाजप ११, शिवसेना शिंदे गट १०, शिवसेना ठाकरे गट ११, मनसे ६, काँग्रेस ५, तर इतर पक्ष ३ जागांवर आघाडीवर असल्याचे चित्र आहे.
मुंबई महानगरपालिकेत सत्ता स्थापन करण्यासाठी ११४ जागांची जादुई संख्या गाठणे आवश्यक आहे. हा आकडा कोण गाठणार, याकडे आता सर्व राजकीय पक्षांचे आणि मतदारांचे लक्ष लागले आहे. विशेष म्हणजे तब्बल २० वर्षांनंतर ठाकरे बंधू एकत्र आल्याने मुंबईच्या राजकारणात नवा रंग चढला आहे. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना ठाकरे गटाने आणि राज ठाकरे यांच्या मनसेने युती करत भाजप-शिंदे गटाच्या महायुतीला थेट आव्हान दिले आहे.
या ठाकरे बंधूंच्या युतीला शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने पाठिंबा दिल्याने शिवसेना ठाकरे गट, मनसे आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र निवडणूक लढवत आहेत. दुसरीकडे भाजप आणि शिवसेना शिंदे गटाने ठाकरेंचा गड असलेल्या मुंबईत सत्ता मिळवण्यासाठी पूर्ण ताकद पणाला लावली आहे. अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस स्वतंत्रपणे मैदानात उतरली असून, काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीने युती करून निवडणूक लढवली आहे.
एकूणच, मतमोजणीच्या सुरुवातीलाच दिसणाऱ्या या चढाओढीमुळे मुंबई महापालिकेचा निकाल अत्यंत अटीतटीचा ठरण्याची चिन्हे आहेत. पुढील फेऱ्यांत कोण बाजी मारणार आणि मुंबईची सत्ता कोणाच्या हाती जाणार, याबाबत उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.



